गोंदियाच्या बिरसीहून हैदराबादला थेट टेक ऑफ, आता मुंबई-पुणेचे विमान उड्डाण केव्हा?

| Updated on: Mar 13, 2022 | 5:27 PM

तब्बल 79 वर्षांनंतर गोंदियाकरांची स्वप्नपूर्ती झाली. गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेचे आज पहिल्यांदा टेकऑफ झाले. लवकरच प्रफुल्ल पटेलांच्या माध्यमातून गोंदिया ते मुंबई-पुणे अशी विमान सेवा सुरू करणार असल्याची माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली.

गोंदियाच्या बिरसीहून हैदराबादला थेट टेक ऑफ, आता मुंबई-पुणेचे विमान उड्डाण केव्हा?
गोंदिया विमानतळावर हिरवी झेंडी दाखविताना खासदार सुनील मेंढे.
Image Credit source: tv 9
Follow us on

गोंदिया : गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून तब्बल 79 वर्षांनंतर आज प्रवासी वाहतूक विमान सेवेला (Passenger Transport Airlines) सुरवात झाली. याचे उद्घाटन नागरी उड्डयण मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते इंदोर येथून करण्यात आले. तर गोंदिया ते हैदराबाद या विमान सेवेला गोंदिया विमानतळावरून खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. पहिल्याच दिवशी या 72 सीटर विमानात 65 लोकांनी या विमान सेवेचा लाभ घेतला. माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते 2008 मध्ये या अत्याधुनिक विमानतळाची निर्मिती करण्यात आली. स्वतः जोतिरादित्य सिंधिया आणि खासदार सुनील मेंढे (MP Sunil Mendhe) यांनीदेखील या उद्घाटनाप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel) यांच्या नावाचा उल्लेख केला. प्रफुल्ल पटेलांच्या स्वप्नांमुळेच उशिरा का होईना आज गोंदियाकराना प्रथमच या विमानतळाचा लाभ घेता आला.

अखेर प्रतीक्षा संपली

गोंदिया शहराला लागून असेलल्या बिरसी गावात ब्रिटिश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1942-43 साली बिरसी विमानतळाची उभारणी केली होती. मात्र स्वातंत्र्याआधी हा विमानतळ पूर्णतः नाहिसा झाला. 2005 मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळाचे आधुनिकीकरण करीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सुरू केले. तब्बल 79 वर्षांच्या कालावधीनंतर केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेस आज प्रारंभ झाला आहे.

या वेळेवर उडेल विमान

फ्लायबिग कंपनीचा प्रवासी विमान इंदोर विमानतळावरून सकाळी 9.30 सुटेल. गोंदिया विमानतळावर सकाळी 10.45 वाजता पोहोचेल. तर हैदराबादसाठी 1 वाजता उड्डाण भरले. त्यानंतर सोमवारपासून वेळापत्रकानुसार नियमित विमानसेवेचा लाभ महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील प्रवाशांना सुद्धा होणार आहे. शेतीविषयक मालाची वाहतूक करण्यास या सेवेची भविष्यात मदत होणार आहे. इंदोर ते गोंदिया पहिला प्रवासी गोपाल अग्रवाल, करिश्मा जैन यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील मेंढे यांचे आभार मानले. लवकरच प्रफुल्ल पटेलांच्या माध्यमातून गोंदिया ते मुंबई -पुणे अशी विमान सेवा सुरू करणार असल्याची माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला, असे अनेक शस्त्र पुढे बाहेर निघतील’, चंद्रशेखर बावनकुळेंचा सरकारला इशारा

Gold Price : आठवड्याभरात सोन्याच्या भावात मोठी घट, चांदीची चमकही घटली

मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण केव्हापर्यंत, सुनील केदारांनी सांगितली तारीख