Gondia News : शाळेला सुट्टी होती म्हणून शेळ्या चारायला गेले होते दोघे मित्र, पण परत घरी आलेच नाहीत !

दहावीत शिकणारे दोघे मित्र शेळ्या चारायला गेले होते. मात्र पुन्हा घरी परतलेच नाही. मग जे घडले त्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली.

Gondia News : शाळेला सुट्टी होती म्हणून शेळ्या चारायला गेले होते दोघे मित्र, पण परत घरी आलेच नाहीत !
नाल्यात पडून दोघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 29, 2023 | 6:41 PM

गोंदिया / 29 जुलै 2023 : शाळेला सुट्टी असल्याने शेजारी राहणारे दोन मित्र शेळ्या चारायला गेल्या होते. गावालगतच्या नाल्याजवळ शेळ्या चारत असताना नाल्यात पडल्याने पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. गोंदिया जवळील मुंडीपार गावात ही घटना घडली. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस नसला तरी नदी, नाले तुंडुंब भरुन वाहत आहेत. नदी, नाल्यांच्या प्रवाहात वाढ झाली आहे. सध्या राज्यात पावसाने धूमाकूळ घातल्याने शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. दोन्ही मुलं शेतकरी कुटुंबातील असून, इयत्ता दहावीत शिकत होते. मुलांच्या अशा अचानक जाण्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय घडलं नेमकं?

दोन्ही मुलं एकमेकांचे मित्र होते आणि एकाच वर्गात शिकत होते. शाळेला सुट्टी असल्याने दोघे शेळ्या घेऊन गावालगतच्या नाल्याजवळ चारायला घेऊन गेले. शेळ्या चारत असताना एका मित्राचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. मित्राला पाण्यात पडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्यानेही पाण्यात उडी घेतली. मात्र यात दोघाही मित्रांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नाल्याकडे धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु आहे.

पुण्यात वरंधघाटात कार धरणात कोसळल्याने तिघांचा बुडून मृत्यू

पुण्यात वरंधघाटात वळणाचा अंदाज न आल्याने कार घाटातून थेट खाली धरणात कोसळली. यात धरणात बुडून कारमधील तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण बचावला आहे. सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वरंधा घाट प्रवासासाठी बंद ठेवण्यात आला आहे. मात्र असे असतानाही या घाटातून कार नेणे चांगलेच महागात पडले आहे.