मुंबईकरांसाठी गुड न्यूजचा डबल धमाका… विहारपाठोपाठ आणखी एक तलाव भरला; पाण्याची चिंता मिटणार?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! जोरदार पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी तुळशी तलावही भरून ओसंडून वाहू लागला आहे. कालच विहार तलाव पूर्ण भरला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या दोन्ही महत्त्वाच्या तलावांतील जलसाठा वाढल्याने शहराच्या पाणीचिंतेत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, एकूण जलसाठा अजूनही 41.43% इतकाच असून, इतर तलाव भरण्याची प्रतीक्षा आहे.

मुंबईकरांसाठी खास बातमी.. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना गुड न्यूज मिळाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून मुंबई आणि तलाव क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावानंतर आता तुलसी तलावही भरून वाहू लागला आहे. विहार आणि तुळशी तलाव छोटे असले तरी मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत. दोन्ही तलाव भरल्याने आता पाच तलाव भरण्याची मुंबईकर वाट पाहत आहेत. दोन तलाव भरल्याने आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांपैकी एक आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या दोन तलावांपैकी एक असलेला तुळशी तलाव मंगळवार, 7 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजून 43 मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे याच दिवशी रात्री 9 वाजता विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांतच तुळशी तलावानेही पूर्ण क्षमतेची पातळी गाठली. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमधील एकूण जलसाठा अद्याप कमाल क्षमतेच्या 41.43 टक्के इतकाच आहे.
गेल्या वर्षी कधी भरला होता तुळशी तलाव ?
गेल्या वर्षी तुळशी तलाव 16 ऑगस्ट 2025 रोजी भरून वाहू लागला होता, तर 2024 साली 4 ऑगस्ट रोजी तलावाने ओसंडून वाहण्यास सुरुवात केली होती. तुळशी तलावाची उपयुक्त जलधारण क्षमता 804.6 कोटी लिटर (8046 दशलक्ष लिटर) इतकी आहे. हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात लहान तलाव असून, येथून दररोज सरासरी 18 दशलक्ष लिटर (1.8 कोटी लिटर) पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे तलाव भरून वाहू लागल्याची माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे.
तुळशी तलावाची ठळक वैशिष्ट्यं :
– तुळशी तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून सुमारे 35 किलोमीटर (22 मैल) अंतरावर आहे.
– या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1879 मध्ये पूर्ण झाले.
– तलावाच्या बांधकामासाठी त्यावेळी सुमारे 40 लाख रुपये खर्च आला होता.
– तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे 6.76 किलोमीटर आहे.
– तलाव पूर्ण भरलेला असताना त्याचे जलक्षेत्र सुमारे 1.35 चौरस किलोमीटर इतके असते.
– पूर्ण क्षमतेने भरल्यावर तलावात 804.6 कोटी लिटर (8046 दशलक्ष लिटर) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होतो.
– तुळशी तलावातून ओसंडून वाहणारे अतिरिक्त पाणी पुढे विहार तलावात जाऊन मिळते.