
Devendra Fadnavis On Gopinath Munde : लातूर शहरात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे तसेच इतर नेतेही उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावराणानंतर फडणवीस यांनी जनतेला संबोधित केले. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्तृत्त्वाबद्दल भाष्य केले. गोपीनाथ मुंडे यांनी केलेली कामे, यावरही फडणवीस यांनी भाष्य करत त्यांच्याप्रतीचा आदर व्यक्त केला. यावेळी बोलताना गोपीनाथ मुंडे आणि मुख्यमंत्रिपदाचा किस्सा सांगितला आहे.
गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, त्याच्याच बाजूला दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचाही पुतळा आहे. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आणि देशात लोकप्रियता मिळवली. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख हे दोन्ही मित्र स्मारकाच्या रूपाने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. हा विलक्षण योगायोग आहे, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
गोपीनाथ मुंडे यांनी एकदा पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर मागे पाहिले नाही. महाराष्ट्रात ज्यांनी भाजपाचा पाया रचला ते नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे आहेत. विरोधी पक्षनेता कसा असावा याचे उदाहरण गोपीनाथ मुंडे यांनी समोर ठेवले. मोघलांना जसे पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसे 90 च्या दशकात विरोधकांना मुंडे दिसायचे, अशा भावनाही यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केल्या. पुढे बोलताना त्यांनी अर्थात मी विरोधकांना मोघल म्हणणार नाही. अलीकडं लोक हवेत बार सोडतात, पुरावे काहीच नसतात. दुसऱ्या दिवशी वेगळेच बोलतात आणि मीडियाही त्यांना प्रश्न विचारत नाहीत, असा टोलाही खासदार शरद पवारांना लगावला.
गोपीनाथ मुंडे यांनी एकदा का भ्रष्टाचार बाहेर काढला की, एखाद्याचा राजीनामा घेतल्याशिवाय खाली बसत नव्हते. गोपीनाथ मुंडे यांनी मकोकासारखा कायदा आणला. एन्काऊंटर सुरू झाले आणि अंडरवर्ल्ड संपवण्याचे काम मुंडे साहेबांनी केले. मुंडे साहेबांच्या नेतृत्वानंतर 15 वर्ष राज्यात आणि देशात भाजपाचे सरकार नव्हते. मात्र मुंडे साहेबांनी संघर्ष सोडला नाही, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पद गेल्यावर लोक फारसं विचारात नाहीत. मात्र पद गेल्यानंतर 15 वर्ष आपलं नेतृत्व टिकवून ठेवण्याचे काम मुंडे साहेबांनी शिकवले. मी गोपीनाथ मुंडे यांची कार्यपद्धती पाहून राजकारण शिकलो. गोपीनाथ मुंडे यांनी मला शिकवण दिली की, सत्ता ही अनेक आमिष आपल्याला दाखवते, आपल्याला वष करते. पण सत्तेशी संघर्ष करायला शिक म्हणजे मोठा होशील. मी अडीच वर्षे विरोधकांना एकही दिवस झोपू दिले नाही. त्याचे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेली शिकवण आहे. सभागृहाच्या अध्यक्षांना सभागृह चालवताना पेच निर्माण झाला की ते अध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांची मदत घ्यायचे. मुंडे साहेबांना कागद पाहून बोलायची सवय नव्हती. त्यांच्याकडे कधी पुराव्याची कागदपत्रे नसली तरी ते कोरे कागद दाखवायचे. कारण सगळ्यांना माहिती होते की ते बोलतात तेव्हा बिगर पुराव्याशिवाय बोलत नाहीत, अशा शब्दांत फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी गोपीनाथ मुंडे यांनी मोठा संघर्ष केला. त्यांचे म्हणणे होते की मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यायला हवे. त्यामुळेच विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव दिले गेले. मुंडे साहेब लोकसभेत गेल्यावर उपनेते झाले. महाराष्ट्रातून गेलेले नेते लोकसभेत हरवून जातात. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्याच अधिवेशनात आपली चुणूक दाखवली. गोपीनाथ मुंडे यांना अधिक काळ मिळाला असता तर देशाचा तारा म्हणून ते राहिले असत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपद आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावरही भाष्य केले. 2014 साली आम्ही मोदीजींना मुंडे साहेब उधारीवर दिले होते. विधानसभा आली की आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवणार होतो, असा गौप्यस्फोटही यावेळी फडणवीस यांनी केला.
मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असं मुंडे साहेबांचं स्वप्न होतं. मात्र त्यावेळच्या राज्याकर्त्यांनी मराठवाड्याला दुष्काळी ठेवले. सत्तेत आल्यावर आम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी 57 टीएमसी वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणतोय. पुढील पाच वर्षात 100 टक्के शेतरस्ते हे पक्के बनवणार आहोत. आमच्या सरकारने हा संकल्प केला आहे पुढील 5 वर्षात शेतरस्ते पक्के करणार आहोत. लातूर मधील 10 हजार रोजगार हे प्रथम स्थानिकांना दिले पाहिजे त्याबाबत मी अधिकाऱ्यांना दरडावून सांगितले आहे, असेही फडणवीस विकासकामांबाबत बोलताना म्हणाले.