
बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आहे. सोलापुरातील बार्शी येथे त्यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. गोविंद बर्गे हे २०२४ पासून पूजा गायकवाड या नर्तकीच्या प्रेमात होते. गोविंद यांनी पूजाला महागडा फोन, दागिने दिले होते. पण तरीही तिची हाव काही संपत नव्हती. तिने गोविंद यांच्याकडे गेवराईतील बंगला आणि काही जमिनीची मागणी केली. याला गोविंद यांनी नकार देताच तिने त्यांच्याशी बोलण बंद केलं. यामुळे ते तणावात गेले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन यात्रा संपवली. आता या सर्व प्रकरणात पूजा गायकवाड या तरुणीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे ती चर्चेत आहे.
पूजा गायकवाड ही इन्स्टाग्रामवर सक्रीय होती. तिने अवघ्या १० दिवसांपूर्वीच म्हणजे १ सप्टेंबरला नवीन इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केले होते. तिने तिच्या प्रोफाईलवर अनेक रिल व्हिडीओ शेअर केले होते. या व्हिडीओत ती विविध गाण्यांवर नाचताना दिसत आहे. आता तिचा आठवड्याभरापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती ब्रेकअपबद्दल बोलताना दिसत आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला ती मला तुझ्यासोबत ब्रेकअप करायचं आहे असे म्हणते. यानंतर एका पुरुषाचा आवाज तिला ब्रेकअप करायचं ना तर खुशाल कर, पण त्याआधी मला सांग तुझ्याकडे नक्की आहे तरी काय, माझ्याकडे गाडी आहे, पैसे आहेत, बंगला आहे, संपत्ती आहे, तुझ्याकडे काय आहे, असे विचारतो. त्यावर पूजा तुझ्यासारखे चार जण, असे उत्तर देते. तिने हा व्हिडीओ शेअर करत त्यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तिच्या या व्हिडीओवर अनेक कमेंटही पाहायला मिळत आहेत.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात गोविंद बर्गेने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामागे एका 21 वर्षीय नर्तकीसोबतचे प्रेमसंबंध कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे. गोविंद बर्गे हे विवाहित असून ते दोन मुलांचे वडील आहेत. 2024 पासून गोविंद बर्गे हे 21 वर्षीय नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत प्रेमसंबंधात होते. पूजाने बर्गे यांच्याकडे तिच्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्याची मागणी केली होती. गोविंद बर्गे यांनी पूजाची ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. यानंतर पूजाने त्यांच्याशी बोलणे टाळण्यास सुरुवात केली. याच कारणामुळे गोविंद नैराश्यात आले होते. यानंतर गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.
गोविंद बर्गे यांनी पूजाला वेळोवेळी पैसे तसेच सोने-दागिने दिल्याचेही सांगितले जात आहे, तरीही पूजा बंगला आणि शेतीच्या जमिनीसाठी तगादा लावत होती. आता याप्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतले असून सध्या याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.