धक्कादायक! पुणे आणि नंदूरबारमध्ये धरण आणि नदीचं संपूर्ण पाणी झालं हिरवं, नागरिक हादरले; काय घडलं नेमकं?
भाटघर धरणाचे पाणी अचानक हिरवे झाल्याने भोर तालुक्यातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. संगमनेर, माळवाडी आणि नन्हे गावांतील जलसाठ्यात हा बदल दिसून येतोय. मासेमारी पिंजऱ्यातील खाद्यपदार्थ हे याचे कारण असल्याचे अभियंते सांगतात. गोमाई नदीतही हिरवे पाणी येत असून माशांचे मृत्यू झाले आहेत. पाण्याच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे.

पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या परिसरातील काही ठिकाणी पाण्याला अचानक हिरवा रंग चढल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी आणि नन्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्यात हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच नंदुरबारच्या प्रकाशा येथील गोमाई नदी पात्रातही केमिकल युक्त हिरवं पाणी येत आहे. त्यामुळे गेल्या तीन चार दिवसापासून गोमाई नदीत केमिकल युक्त पाणी येत असल्याने माशांचाही मृत्यू होत आहे. यामुळे एकच खलबळ माजली आहे.
भाटघर धरणाचं पाणी झालं हिरवं! स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण; काय आहे नेमकं कारण?..
भोर तालुक्यातील भाटघर (येसाजी कंक जलाशय) धरणाच्या परिसरातील पाण्याला अचानक हिरवा रंग चढल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बॅक वॉटर क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी व नन्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्यात हा बदल स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकारामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या परिणामकारकतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
भाटघर धरण शाखा अभियंता गणेश टेंगले यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “मत्स्य विभागाने धरणात काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत. त्यात टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जलाशयात शेवाळ वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि परिणामी पाण्याला हिरवा रंग दिसून येतो. तो काही कालावधीत पूर्ववत होतो.”
घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी जलाशयातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत स्थानिकांनी व्यक्त केलेल्या शंकेनंतर त्वरित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाण्यातील तवंग हटवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबवण्याच्या सूचनाही संबंधित विभागास दिल्या आहेत.
धरणाच्या पाण्यातील हा रंग बदल जैविक की रासायनिक प्रक्रिया आहे, याबाबत वैज्ञानिक आणि निष्पक्ष स्पष्टीकरण मिळावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने यावर कार्यवाही करावी, अशी आग्रही भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
गोमाई नदी पात्रात केमिकल युक्त हिरवं पाणी
नंदुरबारच्या प्रकाशातील गोमाई नदीपात्रात केमिकल युक्त हिरवगार पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलो, केमिकल युक्त पाण्यामुळे मोठ्या संख्येत माशांच्या मृत्यू होत आहे. मात्र हे केमिकल युक्त हिरवं पाणी कुठून येत आहे. याबाबत कोणालाही कल्पना नाही आहे. गेल्या तीन चार दिवसापासून केमिकल युक्त पाणी येत आहे. या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीच्या वातावरण निर्माण झाला असून, शेती पिकांना देखील पाणी शेतकरी देत नाही आहे तर नदीपात्रात आलेल्या केमिकल युक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला देखील परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही आहे.
