
राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, मात्र ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅझेटला विरोध होत असून, ओबीसी विरोधात मराठा समाज असं चित्र पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता एसटीमधू आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यात धनगर समाजानं देखील आंदोलन सुरू केलं आहे.
आज ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात येऊन धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलेल्या आंदोलकांची भेट घेतली, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतानाच त्यांना खोचक टोला देखील लगावला आहे. जालन्यात येत असताना गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे, यावर देखील सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
ज्यांना संविधान माहिती नाही ते असे हल्ले करतात, मनोज जरांगे पाटील यांच्या दलालांच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. जिसका कोई नही होता, उसका गुणरत्न सदावर्ते होता है, माझ्या धनगर बांधवांसाठी आरक्षण घ्यायला मी इथे आलो आहे, मराठ बांधव मागास नाहीत, त्यांना ओबीसीमध्ये एन्ट्री मिळणार नाही, असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांना खोचक टोला देखील लगावला आहे. लोक मुलींना नांदायला पाठवतात, मात्र जरांगे पाटील यांनी एक परंपरा सुरू केली आहे, जरांगे स्वत: नांदायला सासुरवाडीला आले आहेत, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
जरांगे पाटील यांनी ढोंग केलं, मराठा बांधवांची फसवणूक केली. जरांगे आता लवकरच तुमचं गाठोडं बांधलं जाणार आहे, असा इशाराही यावेळी सदावर्ते यांनी दिला आहे. दरम्यान आता आपली पुढची भेट अंतरवाली सराटीमध्येच होईल असंही सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना म्हटलं आहे.
सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न
दरम्यान जालन्यामध्ये येताना सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप होत आहे.