शाळेत ‘हिंदी’ची सक्ती, ‘जर राज ठाकरेंनी विरोध केला तर आम्ही…’, सदावर्तेंंचा थेट इशारा

शैक्षणिक अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आहे, यावर प्रतिक्रिया देताना सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

शाळेत हिंदीची सक्ती, जर राज ठाकरेंनी विरोध केला तर आम्ही..., सदावर्तेंंचा थेट इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2025 | 8:32 PM

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’ तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे, शासनाच्या या निर्णयानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यावरून थेट इशारा दिला आहे. ‘मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही,’  असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

सगळ्यात अगोदर राज्य शासनाने जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. ही उपलब्धी करून दिली त्याबद्दल मी सरकारचं स्वागत करतो. विद्यार्थी हितासाठी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. राज ठाकरे यांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी जे ट्विट केल ते लोकांच्या विरोधी आहेत का? मी त्यांच्या भूमिकेची निंदा करतो, निषेध करतो. तुमच्या धमक्यांना संविधान उत्तर देईल, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या देशाची संस्कृती आहे, जेव्हा बाल वयात जर मुलांना ज्ञान मिळवण्याची संधी मुलांना उपलब्ध होत आहे, तर तुम्ही त्याला विरोध का करत आहेत?  तुमच्या वैयक्तिक खिशातून पैसे जाणार आहेत का? हे दु:ख नेमकं कशाचं आहे? नेत्यांची लेकरं इंग्रजी शाळेत शिकणार आणि सामान्यांच्या लेकरांनी काय स्थानिक शाळेत शिकायचं का? असा सवालही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे.

‘देख लेंगे राज ठाकरे कितना है दम, जे याला विरोध करत आहेत ते जिंकणार आहेत की विद्यार्थी जिंकतील हे आम्ही बघून घेऊ’ असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे. मुलांना नवीन संधी आहे, कोणी त्यात अडथळा आणू नये, राज ठाकरे यांचा निषेध करतो, त्यांनी काही केलं तर न्यायालयात आम्ही आवाज उठवू, पालकांसोबत राहु हे डंके की चोट पे सांगतो असा इशाराही यावेळी सदावर्ते यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us