निकाल जाहीर होताच भाजपात दुफळीचं वादळ, मुनगंटीवार यांच्या नाराजीनंतर माजी मंत्र्याचं मोठं विधान!

नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाला जबर धक्का बसला. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावरच आता भाजपातील माजी मंत्र्याने मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे.

निकाल जाहीर होताच भाजपात दुफळीचं वादळ, मुनगंटीवार यांच्या नाराजीनंतर माजी मंत्र्याचं मोठं विधान!
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 21, 2025 | 8:01 PM

Sudhir Mungantiwar : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाला जबर धक्का बसला आहे. येथे एकूण 11 नगरपरिषदांच्या निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर माजी मंत्री तथा भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने पक्षाला चांगली कामगिरी करता आलेली नाही, असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे मुनगंटीवार यांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुनगंटीवार यांना ताकद पुरवू असे जाहीरपणे सांगितले आहे. दरम्यान, मुनगंटीवार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. असे असतानाच आता भाजपामधील दुफळी समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुनगंटीवार यांनी मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर भाजपाचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मंत्रिपद कशाला लागते? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

हंसराज अहीर नेमकं काय म्हणाले?

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकालानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपात दुफळीचे वादळ घोंगावले आहे. दिग्गज नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने मोठा पराभव झाल्याची प्रतिक्रिया देत राज्यातील पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. याला उत्तर देताना जिल्ह्यातील माजी भाजप खासदार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुनगंटीवार यांना टोलाल लगावला आहे. निवडून आलेल्या आमदार- लोकप्रतिनिधींनी नगरसेवकांना निवडून आणायचे असते, असे म्हणत अहीर यांनी मुनगंटीवार यांना डिवचले आहे. मंत्रिपद आणि विजय यांचा संबंध नाही. या खेपेस विरोधकांची यंत्रणा सक्षम असेल, म्हणूनच विरोधकांचा विजय झाला, असेही मत अहीर यांनी व्यक्त केले. आम्ही चंद्रपूरचा काँग्रेसचा गड जिद्दीने भाजपकडे खेचून आणला आहे. आगामी निवडणुकात पुन्हा एकदा भाजपला जिंकवू असा विश्वासही अहीर यांनी यावेळी व्यक्त केला.

मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त करताच फडणवीस काय म्हणाले?

चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले नाही. सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया चार जिल्ह्यांत एकही मंत्रिपद नाही. ऐन निवडणुकीत अन्य पक्षांच्या नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला, असे म्हणत मुनगंटीवार यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारले असता फडणवीस यांनी पक्षाचे दार कोणासाठीही बंद नसावे. खरं तर पक्षाचा दरवाजा कायमच उघडा असला पाहिजे. या काळात जे काही पक्षप्रवेश झाले, त्याचा भाजपाला फायदाच झाला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुनगंटीवार यांना ताकद परवू, असे सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार यांना नेमकी कोणती ताकद पुरवाली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.