कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी केली मोठी मागणी

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी केली मोठी मागणी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 05, 2025 | 7:45 PM

अवकाळीचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले सपकाळ?  

माणिकराव कोकाटे हे पहिल्यांदाच असं बोलले नाहीत तर यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांबद्दल त्यांनी असेच विधान केलं होतं. शेतकऱ्यांची तुलना त्यांनी भिकाऱ्यांशी केली होती, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी असं वक्तव्य केलं. कर्ज भरत नाहीत अन् साखरपुडा, लग्न करतात अशी वक्तव्य कृषीमंत्र्यांना शोभत नाहीत. त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करायला पाहिजे. मात्र लाडके मंत्री म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र दुसरीकडे सुनील केदार, राहुल गांधी यांच्यावर 24 तासांच्या आत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे हे सरकार विकृतांच्या पाठिशी असल्याचं दिसून  येत आहे, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, मी माणिकराव कोकाटेंच्या विधानाचा निषेध करतो. सध्या शेतकऱ्यांवर असमानी संकट आहे. गारपीटीचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफी केली पाहिजे. मात्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना दिलासा द्यायाला तयार नाही, यांनी आरोग्य मिशन गुंडळण्याचं काम सुरू केलं आहे, असा टोला यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.

कोकाटेंनी काय म्हटलं होतं? 

कर्जमाफी होणार आहे का? असा प्रश्न विचारणऱ्या शेतकऱ्यावर कोकाटे चांगले संतापले. त्यांनी शेतकऱ्याला सुनावलं. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी या शेतकऱ्याला म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता चांगलंच वातावरण तापलं असून, विरोधक आक्रमक झाले आहेत. सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.