राज्याच्या या भागात उष्णतेची लाट, तापमान 47 अंशांवर… 24 तासांसाठी IMD कडून अलर्ट जारी

IMD Heatwave Alert : विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम असून, काही भागात तापमान 47°C पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्याच्या या भागात उष्णतेची लाट, तापमान 47 अंशांवर... 24 तासांसाठी IMD कडून अलर्ट जारी
Heat Wave Alert Vidharbha
Image Credit source: Google
| Updated on: Apr 27, 2026 | 2:55 PM

संपूर्ण देशात उन्हाचा कडाका पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागातील तापमान 45 अंशांच्या वर गेले आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच आता विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात तापमान 47 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर हवामान विभागाने नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

3 जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यातील हवामानाबाबत बोलताना नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितले की, देशभरातील सर्वाधिक तापमान विदर्भात नोंदवले गेले आहे. यात अकोला अमरावती आणि वर्धा हे देशाच्या सर्वाधिक तापमान असलेल्या शहराचा यादीत पोहचले आहेत. आज विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्ध्याला उष्णतेसाठी 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कारण या ठिकाणी 47 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.

24 तासांनंतर पावसाची शक्यता

पुढे बोलताना प्रवीण कुमार यांनी म्हटले की, आजही सूर्य पुन्हा आग ओकणार आहे. 29 आणि 30 एप्रिलला काहीसा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. 24 तासानंतर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे, त्यामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळेल. मात्र मे महिन्यात पुन्हा उष्णता वाढणार आहे. मे महिन्यात एप्रिलपेक्षा जास्त तापमान जाणवणार आहे. मे महिना विदर्भासाठी सर्वात उष्णता असलेला महिना ठरेल असंही नागपूर हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन

दरम्यान, तापमान वाढल्याने राज्याच्या अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच जर घराबाहेर पडायचे असेल तर योग्य ती खबरदारी घेण्याचेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कारण राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्माघातामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Follow Us