
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांसह राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. अशातच मुंबईजवळील वसईमध्ये परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसाच्या पाण्यात अनेक लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक लोक जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचेही समोर आले आहे.
वसई-विरार-नालासोपाऱ्यापर्यंत जलप्रकोप पहायला मिळत आहे. महापालिका आयुक्त आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांच्याकडून पूर्ण परिसराची पाहणी सुरू आहे. मागच्या 24 तासात 200 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक लोक पाण्यात अडकले आहेत. सकाळपासून वसईतील मिठागराला पावसाच्या पाण्याने वेडा टाकला असून आतमध्ये 100 कुटुंबातील 400 नागरिक अडकले आहेत. यातील काही नागरिक गळ्याइतक्या पाण्यातून बाहेर आले आहेत. पालिकेने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वसईतील कामन चिंचोटी येथील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगर या ठिकाणावरून 100 रहिवाशांना रेस्क्यू करण्यात आले आहे. अनेकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या अंगावर फक्त कपडे उरले आहेत. या लोकांना अंगणवाडी व जॉन स्कूल या ठिकाणी हलवण्यात येत आहे. येथे नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वसईच्या मिठागर वसाहतीत अडकलेल्या रहिवाशांसाठी बोटीची व्यवस्था केल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे.
वसई-विरार-नालासोपारापर्यत सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचे दिसत आहे. अनेक रस्ते आणि सखल भाग पाण्याखाली गेला आहे. नालासोपारा पूर्व, आचोळा, तुळींज, सेंट्रलपार्क, स्टेशन परिसर, पश्चिम पठाणकर पार्क, श्रीप्रस्थ वसई सागरशेत, नवजीवन, विरार पश्चिम, विवा कॉलेज, युनिटेक कॉम्प्लेक्स हा सर्वच भाग पाण्याखाली गेला आहे.
वसईत रस्त्यावर साचलेल्या पाण्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात आदळल्याने अपघात झाला आहे. यात मागे बसलेली महिला जोरात रस्त्यावर पडून जखमी झाली आहे. वसईच्या गिरीज गण नाका येथे ही घटना घडली आहे. ही महिला रस्त्यांवर पडल्यानंतर पाठीमागून बस येत होती, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत सध्या रस्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून, त्यातून मार्ग काढताना दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. पालिका खड्डे बुजवत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.