अवकाळीनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला; मका,तूर, ज्वारीसह सगळं पीक मातीत…

| Updated on: Mar 13, 2023 | 9:49 PM

अवकाळीमुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबत पिकांसोबतच केळी आणि पपई यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

अवकाळीनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला; मका,तूर, ज्वारीसह सगळं पीक मातीत...
Rain
Follow us on

नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. रब्बी हंगामामध्येच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडे सरकारनेही दुर्लक्ष केल्याने आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज सायंकाळी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.  सायंकाळची वेळी वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह नवापूर तालुक्यातील खांडबारा आणि नंदुरबार तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांची यावेळी प्रचंड धावपळ उडाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसापूर्वीही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला होता.

त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे.

आज पुन्हा दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाल्याने नंदूरबार, नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

नंदूरबार, नवापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पीकंही काढणीला आली असून शेतमालही शेतात पडून आहे. यामध्ये मका , तूर , गहू , कापूस , ज्वारी या पिकांच्या समावेश असून अवकाळीमुळे बाजारभाव कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवकाळीमुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबत पिकांसोबतच केळी आणि पपई यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

तर अवकाळी पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील विद्युत पुरवठादेखील काही भागात खंडित करण्यात आल्याची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने कागदी घोडे न नाचवता बळीराजाला सरसकट मदत करावी अशी मागणी आता शेतकरीवर्गातून केली जात आहे.