पहिल्याच पावसात ढगफुटी, नदी-नाल्यांना पूर… राज्यातील या जिल्ह्यांना मान्सूनचा तडाखा
Heavy Rainfall Maharashtra : आता जवळपास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात लोकांचे हाल झाले आहेत. काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे.

मान्सूनचा पाऊस लांबल्याने राज्यातील जनतेत चिंतेचे वातावरण होते, मात्र आता जवळपास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात लोकांचे हाल झाले आहेत. अमरावती शहरात सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यांची पुरती दाणादाण उडाली आहे. शहरातील अत्यंत गजबजलेला मार्ग असलेल्या इर्विन चौक ते राजकमल दरम्यानच्या उड्डाणपुलाखालील रस्त्याला थेट नदीचे स्वरूप आले होते. या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अक्षरशः पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हवामान विभागाने अमरावतीत रात्रभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अमरावती
अमरावती जिल्हा परिषदेत पावसाचे पाणी शिरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कार्यालयाला आले नदीचे स्वरूप आले. मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली, तसेच वीजपुरवठा खंडित झाला. या पावसामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे साहित्य भिजले. कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महत्त्वाच्या शासकीय फायली, संगणक आणि इतर प्रशासकीय साहित्य पाण्यात भिजले आहे.
जळगावच्या अनेक भागात ढगफुट
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कर्की, अनेक भागात ढगफुटीस सदृश्य पाऊस झाला. कर्की येथे साखरपुड्यासाठी आलेली खाजगी बस नाल्यावरून पाणी आल्याने अडकली. मात्र चालकाने तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच अनेकांच्या घरात पाणी घुसून संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले आहे. तर काही दुकानात पाणी घुसल्यानेही मोठे नुकसान झाले आहे. आता पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली आहे. तसेच रावेरच्या खिरवड येथील नदीला पूर आला आहे. खिरवड-नेहेते रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.
अकोला पहिल्याच पावसात हाहाकार…
पहिल्याच पावसात अकोला जिल्ह्याचं चित्र बदललं आहे. ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहतायेत. सातपुडा पर्वतरांगात झालेल्या पावसामुळे या पर्वतरांगातील नदी ओढे दुथडी भरून वाहतानाचे चित्र दिसत आहे. पोपटखेडच्या भागातील पर्वतरांगावरून वाहणारा ओढा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
सांगली-मिरजेत पावसाची दमदार हजेरी
सांगली-मिरज शहरासह परिसरामध्ये दुपारी जोरदार पाऊस पडला आहे. काल सायंकाळ पासून रिमझिम स्वरूपात पाऊस पडायला सुरुवात झाली होती, मात्र आज सकाळपासून पुन्हा उन्हाचा कडाका वाढला होता. पण दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन, सांगली आणि मिरज शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असून पेरणीच्या कामाला आता वेग येणार आहे.
दापोलीत मुसळधार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे दाभोळ गाव अंधारात डुबलं होतं. तब्बल 24 तास नागरिक अंधाराच्या विळख्यात अडकले होते. पण अशा वेळी महावितरणचे कर्मचारी देवदूत बनून धावले. काटेरी जंगल, धो-धो पाऊस आणि जीवघेणा अंधार तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी खांद्यावर खांदा देत मानवी मनोरे रचले आणि पोलवर चढून वीजपुरवठा पूर्ववत केला.
परभणीत ढगफुटी
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे आडगाव परीसरातील तीन ओढ्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरून माती खरडून गेल्याने शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. तर आडगाव, मोहखेड, गडदगव्हाण, सोरजा, टाकळखोपा यासह 10 ते 12 गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. मागील एका तासापासून वाहने पुरात अडकल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
धुळ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत
धुळे शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली शहरात जोरदार पावसाने आगमन केल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले होते. हवामान खात्याच्या वतीने धुळे जिल्ह्याला ऑरेंज जाहीर करण्यात आला आहे. तीन तासाच्या अलर्ट नंतर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक जोरदार पाऊस झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. सुमारे एक तास चालल्या पावसामुळे गेल्या अनेक दिवसापासूनच्या उकड्याने त्रस्त झालेल्या धुळेकरांना काहीसा दिलासा मिळाला.
चाळीसगाव तालुक्यात पावसाची सातत्यपूर्ण हजेरी
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात अखेर पावसाने सातत्य दाखवण्यास सुरुवात केली आहे. मान्सून दाखल होऊनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या आणि शेतकरी चिंतेत होता. परवा तालुक्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसानंतर आजही सकाळपासून अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे. वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून पावसामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची दमदार एन्ट्री
छत्रपती संभाजीनगर शहरात आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच शहराच्या विविध भागांत रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी कार्यालये, शाळा आणि व्यावसायिक कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पावसाने अचानक गाठल्याने अनेकांची धावपळ उडाली. काही ठिकाणी वाहतूकही संथ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाशिम : सोलर पॅनलचे नुकसान
वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळात काही ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब कोसळले असून शेतकऱ्यांनी शेतात बसवलेले सोलर पॅनलही उखडून पडले आहेत. शेतकरी मंकर्णा नामदेव गावंडे यांच्या शेतातील सोलर यंत्रणेचे पूर्ण फाऊंडेशनसह मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून आगामी सिंचनाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
जळगाव : रावेरच्या अहिरवाडी परिसरात मुसळधार पाऊस
रावेरच्या अहिरवाडी परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. जिल्हा परिषद शाळेत पुराचे पाणी घुसले ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना रेस्क्यू केले. जवळपास 100 च्या वर विद्यार्थी शाळेत अडकून पडले होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. नागवेली नदीच्या पुराचे पाणी अहिरवाडी गावात शिरले असल्याचेही समोर आले आहे.
पोलादपूर रायगड
कशेडी घाटात चोळई गावाजवळ मुसळधार पावसामुळे दगड-मातीची दरड कोसळली असून मुंबई-गोवा महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. भोगाव हद्दीतील ‘डेंजर झोन’मध्येही दरडीचा धोका कायम असल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या असल्या तरी पावसाळ्यात वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लातूर
लातूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे, रिमझिम पाऊस पडतो आहे. जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. अचानकपणे पाऊस झाल्याने वातावरणात गारठा पसरला आहे. कमालीची उष्णता वाढल्याने आज पासून शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश देण्यात आले होते.
सिंधुदुर्ग
तासभर लागलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली येथे पुलावरती पावसाचे पाणी साचलेले पाहायला मिळाले. पहिल्याच पावसात पुलावरती पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातूनच मार्गक्रमन करत कसरत करावी लागत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी हायवे प्राधिकरणाकडून कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे हायवे प्राधिकरणाने दखल घेऊन लवकरात लवकर पाण्याचा निचरा करावा अशी मागणी वाहनचालकांकडून होताना पाहायला मिळते.
पहिल्याच पावसात जालना शहर महानगरपालिका तुंबली
जालना जिल्ह्यात कालपासून सर्वदूर मान्सूनचा पाऊस बरसत असताना पहिल्याच पावसात महानगर पालिकेच कार्यालय तुंबल्याच पाहायला मिळालं. पालिकेच्या प्रवेशद्वारातच पावसाने तळ साचल्यान पालिकेच्या मान्सूनपूर्व पावसाची तयारी उघडी पडली. कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच पाणी साचल्यान पालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान प्रवेशद्वारातच साचलेल्या पाण्यामुळे कर्मचारी, नागरिक आणि कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत असून, पहिल्याच पावसात ही परिस्थिती निर्माण झाल्याने आश्चर्य व्यक्त होतेय..
छत्रपती संभाजीनगर : सोयगावच्या जरंडी परिसरात ढगफुटी
सोयगावातील जरंडी परिसरात आज दीडतास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने परिसरातील सर्व नदी नाल्यांना पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती. जरंडी जवळील ग्रामपंचायतीची घंटा गाडी पुराच्या पाण्यात वाहून जातांना ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी वाचवली तर एका इसमाची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली सुदैवाने ग्रामस्थांनी मोटरसायकलस्वाराचे प्राण वाचविले.