AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल

Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल

| Updated on: Aug 10, 2026 | 12:00 PM
Share

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी देण्यात आलेले आदेश तातडीने मागे घ्यावेत आणि झालेली चूक दुरुस्त करावी, अशी मागणी त्यांनी केली. “अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्याची चूक मान्य करावी. अन्यथा यापेक्षाही मोठं आंदोलन करेल,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून, सांगली दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. आगामी 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, त्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील राज्यभरात मराठा समाजाशी संवाद साधत आहेत.

दरम्यान, जात पडताळणी समितीच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याचा संदर्भ देत जरांगे पाटील यांनी सरकारला सवाल केला. “सरकारला अधिकार नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने काम सुरू आहे, असं सांगितलं जातं. मग बावनकुळेंना कोर्टाने इंडोसमेंट करण्याचे अधिकार दिले आहेत का? मग बावनकुळेंचं पत्र काय आहे? हा सरकारचा हस्तक्षेप नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मराठा समाजामध्ये या प्रकरणावरून संताप निर्माण झाला असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून मराठा समाजाच्या जुन्या नोंदी रद्द करण्यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

नोंदींमध्ये असलेल्या किरकोळ चुका दाखवून प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. कुठे ‘कुणबी’ शब्द वेगळ्या पद्धतीने लिहिला आहे, कुठे पेन किंवा शाई बदलली आहे, तर कुठे हस्ताक्षरात फरक आहे, अशी कारणे दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गावांमध्ये तलाठी बदलत असतात, त्यामुळे हस्ताक्षर बदलणे स्वाभाविक असल्याचे सांगत त्यांनी या कारणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“एकच तलाठी 50-50 वर्ष एकाच गावात राहतो का?” असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी नोंदी रद्द करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. सरकारकडून वेगवेगळे बहाणे शोधले जात असल्याचा आरोप करत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आक्रमक शब्दांत टीका केली.

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भातील आदेश मागे न घेतल्यास आगामी काळात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. आता जरांगे पाटील यांच्या आरोपांवर राज्य सरकार आणि चंद्रशेखर बावनकुळे काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 10, 2026 12:00 PM

Follow Us