
महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशीही ते सातत्याने संपर्कात आहेत.
राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला. बारामतीत 25 घरांची अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत.
इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे. फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफचं एक पथक फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे.
रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे. – मुंबईत 24 तासांत 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत. मुंबईत पुढील 24 तासांमध्ये विजांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
ठाण्यालाही पावसानं झोडपलं
ठाण्यातही जोरदार पाऊस झाला आहे, रात्रभर संपूर्ण जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता, बदलापूर, मुरबाड परिसरात पावसाची तीव्रता जास्त होती, जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात पाऊस झालेला आहे, मात्र सर्व परिसरात आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
काही वेळाकरिता बदलापूर रेल्वे स्थानकात पाणी साचलं होतं, ते आता पूर्णपणे मार्गी लागलं आहे. वाहतूक सुरळीत सुरू आहे. लोकल ट्रेन दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत आहेत, पण कुठेही पूर्णपणे ट्रेन ठप्प झालेली नाही. सकाळच्या वेळी ट्रेन उशिराने धावत असल्याची परिस्थिती होती, सर्व ठिकाणची रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहेत.
पावसाळ्यात नौसर्गिक आपत्ती, पाऊस, पाणी तुंबण्याचे प्रसंग होऊ शकतात, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाचं काम सुरू असल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात 700 धोकादायक इमारती आहेत, त्यातील कुटुंबांना अन्य ठिकाणी स्थलांरीत करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. 70 ते 80 टक्के नालेसफाई पूर्ण झालेली आहे. तीन ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत, या घटनेत काही ठिकाणी जाणवरांचा मृत्यू झालेला आहे, एका ठिकाणी एका व्यक्तीचा देखील मृत्यू झालेला आहे. यासाठी आपण वीज अटकावं केंद्र उभं केलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत उल्हास नदी धोक्याच्या पातळीपेक्षा बरीच खाली वाहत आहे, प्रशासन लक्ष ठेऊन आहे, त्याठिकाणी जाऊन पाहणी देखील केलेली आहे, सध्या परिस्तितीत कुठल्याही नदीची पातळी धोक्याच्या वर गेलेली नाही, रस्ते सुरळीत सुरु आहेत, रेल्वे सुरु आहे. माझी फक्त विनंती आहे या परिस्थितीत लोकांनी आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडावं एवढंच सर्वांना आवाहन असंही यावेळी ठाण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.