
Maharashtra Rain: कोकणामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावांसोबत संपर्क तुटला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा मुंबई-गोवा महामार्गाला देखील मोठा फटका बसला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनंतर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना १५ जुलै २०२५ रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. वाढत्या पावसामुळे काही भागातील नद्यांना पूर आला आहे.
कोकणातील मुसळधार पावसाचा फटका कशेडी घाटाला बसला आहे. कशेडी घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पडलेली दरड हटवण्याचे काम स्थानिक प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे दरड हटवण्याचा कामाला वेळ लागत आहे.
रायगड जिल्ह्यातल्या मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला मोठा फटका बसला आहे. मुंबई गोवा महामार्गाजवळील नागोठणे कोलाड खांब परिसरात खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई गोवा महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रायगडमधील म्हसळा तालुक्यात सकाळपासून तुफान पाऊस सुरू आहे. म्हसळा तालुक्यातील ढोरजे गावाला जोडणारा छोटा पूलवर पाणी आले आहे. यामुळे पाच गावांचा संपर्क तुटला आहे. म्हसळा दिघी मार्गावर देखील पाणीच पाणी साचल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सकाळपासून काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण रायगडमधील म्हसळा श्रीवर्धन तालुक्यात सुद्धा पावसाने सकाळपासून झोडपले आहे.
रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. संगमेश्वर तालुक्यात 142 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील कसबा, शास्त्री पूल भागाला पावसाने जोरदार झोडपले आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखझन बाजार पेठेत पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे बाजारपेठेतील धोका वाढणार आहे. प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरीमधील मंडणगड तालुक्यात सकाळी सहा वाजता मुसळधार पावसामुळे भिंगळोली येथील बस डेपो व शासकीय रेस्टहाऊसमध्ये पुराचे पाणी शिरले. तसेच दापोली फाटा समर्थनगर येथील अनिल घरटकर व राजू नगरकर यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले.
मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड आणि अंधेरी भागात सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. जुईनगर, बेलापूर, पनवेलमध्ये पाऊस सुरु आहे. पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस पुणे शहर आणि शहरालगत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात उसंत घेतलेल्या पावसाची संततधार सुरु झाली आहे. यामुळे चांदोली धरणातून 8530 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 114 मीटर पाऊस झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 143 किलोमीटर पाऊस झाला आहे. चिपळूणमध्ये 134, मंडणगड 114, संगमेश्वर 142 मिलिमीटर पाऊस झाला आहे.