
लग्न करून सुखाचा संसार करण्याचं, जोडीदारासोबत एकत्र जगण्याचं, हसत-खेळतं कुटुंब असण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. बहुतांश लोकांचं लग्न जमतं, मनासारखा जोडीदारही मिळतो, पण काही लोकं असे असतात ज्यांचं लग्नच जमत नाही, वय वाढूनही त्यांचा विवाह योग काही येत नाही. असाच एक तरूण आहे अकोल्याच्या ग्रामीण भागातला. वय वाढूनही लग्न न झाल्याने त्या तरूणाने मदतीसाठी थेट याचना केली ती ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद वापर यांच्याकडे. त्या तरूणाने शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली.
वय वाढूनही माझं लग्न होत नाहीये, नवं आयुष्य सुरू करण्यासाठी जोडीदार मिळवू द्या अशी विनंती त्याने पत्रातून शरद पवार यांना केली असून सध्या हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
तुमचे उपकार विसरणार नाही, लग्नासाठी तरूणाचं शरद पवारांना साकडं
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या या तरूणाने शरद पवार यांच्यासाठी हे पत्र दिलं. शरद पवार अकोल दौऱ्यावर असताना हे पत्र देण्यात आलं. – “मी शेतकरी वर्गातील आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे कुणीही मुलगी देत नाही. वय 34 झालं पण मुलगी मिळत नाही,” असं म्हणत त्याने शरद पवारांकडे विनंती केली आहे. त्याची ही मागणी ऐकून सर्वत अवाक् झाले, सध्या हे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे.
काय म्हटले आहे पत्रात ?
माझे वय सध्या 34 वर्षांचे पूर्ण झाले आहे. दिवसेंदिवस माझे वय वाढत असल्याने भविष्यात माझे लग्न होणार नाही व मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्यामार्फत मिळवून दयावी जेणेकरून मी माझ्या संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकेन. व पुढील आयुष्य गुण्या-गोविंदाने जगू शकेल. मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे. व मुलीच्या माहेरीसुद्धा जाण्यास तयार आहे. मी मुलीच्या घरी जाऊन चांगल्या तऱ्हेने काम करेन याची हमी देतो.
तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपुरवक विचार करावा आणि मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळवून द्यावी ही विनंती . मला जीवनदान द्यावे, तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही – असं त्या तरूणाने शरद पवारांना लिहीलेल्या पत्रात नमूद केलं आहे. हे पत्र समोर आल्यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
त्या तरूणासाठी वधू शोधण्याचे प्रयत्न करणार – अनिल देशमुख
हे पत्र मिळाल्यावर पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी जयंत पाटील यांना हे पत्र वाचायला सांगिल्याचं शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं. त्यांच्या सूचनेनुसारच, त्या तरूणाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अनिल देशमुख म्हणाले. ” अकोला येएथे एका तरूणाने हे पत्र पवार साहेबांना दिलं, दुसऱ्या दिवशी आमची पक्षाची मीटिंग होती, त्यांच्यासमोर हे पत्र जयंत पाटील यांना वाचायला दिलं, त्यानंतर या तरूणाच्या लग्नासाठी मदत करण्यास पवार साहेबांनी सांगितलं. त्यानुसार आता राष्ट्रवादी पवार गटाचे नेते त्या तरुणाला लग्नासाठी मुलगी शोधण्याची प्रयत्न करणार आहेत. विदर्भात त्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून प्रयत्न करणार ” असं अनिल देशमुखांनी सांगितलं.