BJP-Sharad Pawar : भाजपचा मास्टरस्ट्रोक, राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिला मोठा झटका
BJP-Sharad Pawar : भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं आहे. भाजप सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुका जानेवारी महिन्यात होऊ शकतात. मात्र, या निवडणुकांआधी मोठ्या प्रमाणात पक्ष बदल सुरु आहे. विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतून सत्ताधारी महायुतीमधल्या पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष विस्तार आणि संघटनात्मक पाया बळकट करणं हे भाजपचं लक्ष्य आहे. त्या दृष्टीने त्यांची रणनिती आहे.
आता सोलापुरात भाजपने मास्टरस्ट्रोक मारला आहे. सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक धक्का दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेपूर्वी सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाच माजी नगरसेकांनी भाजपत प्रवेश केलाय. सोलापूरच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचा मुलगा प्रथमेश कोठे यांच्यासह पूर्ण गटाने भाजपमध्ये प्रवेश केला.
पुन्हा एक मास्टरस्ट्रोक
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पुन्हा एक मास्टरस्ट्रोक पहायला मिळाला.
भाजपमध्ये पुन्हा जुने विरुद्ध नवे असा वाद होण्याची शक्यता
माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे वडील दिवंगत महेश कोठे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा जुने विरुद्ध नवे असा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र आगामी महानगरपलिका निवडणूकीच्या अनुषंगाने कोठे परिवार एकत्र आल्याने सोलापुरात जोरदार चर्चा सुरु आहेत. सोलापुरात अलीकडे अन्य पक्षातील बऱ्याच नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
