Uddhav Thackeray : ‘तुम्हाला बाहेरचे नेते आणि माझे वडील लागतात, तुमच्या दिल्लीतल्या वडीलांना…’; हिंगोलीमधून ठाकरेंनी ओढलं आसूड!

सरकार आपल्या दारी थापा मारतंय लय भारी, भाजपच्या नेत्यांमध्ये नेते तयार करण्याचं कतृत्त्व नाही, यांना नेते बाहेरचे लागतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हिंगोलीमधील सभेमध्ये जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray : तुम्हाला बाहेरचे नेते आणि माझे वडील लागतात, तुमच्या दिल्लीतल्या वडीलांना...; हिंगोलीमधून ठाकरेंनी ओढलं आसूड!
| Updated on: Aug 27, 2023 | 4:20 PM

हिंगोली : शिवसेना फुटल्यानंतर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघाती टीका केली. भाजपच्या नेत्यांमध्ये नेते तयार करण्याचं कतृत्त्व नाही, यांना नेते बाहेरचे लागतात आणि वडील माझे लागतात, असं म्हणत ठाकरेंनी आसूड ओढलं. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री शिंदेंवरही, आपल्या दाढीलवाल्याने पण पावडर लावल्याचं म्हणत ठाकरेंनी टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

डबल इंजिन सरकार त्यात आता आणखी एक डबा अजित दादांचा लागलाय. अजून किती डबे लागणार आहेत, जणू काय मालगाडी आहे का? डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौपल इंजिन. तुमच्या पक्षामध्ये चांगले नेते तयार करायचे काही कतृत्व नाही. तुम्हाला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात, पक्ष फोडला पण वडील माझे वापरायचे का तुमच्या दिल्लीतल्य वडीलांमध्ये मतं मागायची हिम्मत नाही राहिली का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

इतर पक्षांचे नेते चोरणार आम्ही हिंदू आहोत आमची ताकद पाहा, कसली डोंबल्याची ताकद याला नामर्द म्हणतात. स्वत:कडे ना कोणता विचार ना आचार. कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही. सरकार आपल्या दारी थापा मारतंय लय भारी, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

संजय बांगरबाबत काय म्हणाले ठाकरे?

गद्दाराला नाग समजून पूजा केली पण तो उलटा डसायला लागला. पायाखाली साप आल्यावर तुम्हाला माहित आहे काय करायचं? मटक्याचे अड्डे चालवणाऱ्या हिंदुत्ववादी मानायचे का?, उद्धटपण चिरडून टाकावा लागणार आहे, असं म्हणत ठाकरेंनी बांगरांवर टीका केली.