
राज्यात हिंदींच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. पहिलीपासून हिंदी नको अशी भूमिका महाराष्ट्रातील अनेक संघटना आणि पक्षांची आहे. हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी पाच जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी आतापासूनच वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोघेही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत. जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता या मोर्चाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान त्यापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आहे. आझाद मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची होळी करण्यात आली. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती आहे. सोबतच या आंदोलनात ठाकरे गटाचे सर्वच प्रमुख नेते सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान या आंदोलनापूर्वी बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या बैठकीला मराठी अभ्यास केंद्राच्या प्रमुखांसह इतर समविचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. या आंदोलनाला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?
दरम्यान जीआरच्या होळीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पुन्हा एकदा या निर्णयावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आम्ही दबाव आणू इच्छित नाही, खरतर हे आम्ही स्विकारतच नाहीत. एखादी गोष्ट ते जर लादणार असतील तर, आम्ही आमच्या वतीनं हा विषय संपवलेला आहे. आम्ही त्या जीआरची होळी केलेली आहे, त्यामुळे आता तो जीआर आहे असं मानण्याचं कारण नाही. कारण एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलं आहे की आमचा हिंदीला विरोध नसला तरी तीची सक्ती आम्ही लादू देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पाच जुलै रोजी मोर्चा
राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, मराठी अस्मितेसाठी येत्या पाच जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. या मोर्चाला जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.