
कोणीही केवळ ‘आय लव्ह यू’ म्हटलं तर त्यामधून लैंगिक हेतू सिद्ध होत नाही. ‘आय लव्ह यू’ म्हणणं ही भावनांची अभिव्यक्ती आहे, तो काही गुन्हा नाही असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलं आहे. तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या एका इसमाची निर्दोष मुक्तताही न्यायालयाने केली आहे. ‘आय लव्ह यू’ म्हणणे म्हणजे केवळ भावना व्यक्त करणं असतं तो काही लैंगिक छळ नव्हे असे न्यायालयाने आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, एका किशोरवयीन मुलीची छेड काढली या आरोपाखाली 35 वर्षांच्या इसमावा 2015 साली अटक करण्यात आली होती. त्या इसमाने तक्रारदार तरूणीला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं. याच प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुरू होती. त्या खटल्याच्या दरम्यान न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवलं. आरोप असलेल्या इसमाने त्या मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटलं, मात्र त्यावरुन त्याचा त्या तक्रारदार मुलीशी लैंगिक संबंध ठेवण्याचा हेतू होता, हे सिद्ध होत नाही असे न्यायालयाने नमूद केलं आणि आरोपी इसमाची निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकलपीठाने हा महत्वपूर्ण निकाल दिला.
कोर्टाने काय म्हटलं ?
उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकलपीठाने आपल्या आदेशात महत्वपूर्ण गोष्टी नमूद केल्या आहेत. कोणत्याही लैंगिक कृत्यामध्ये अनुचित स्पर्श, जबरदस्तीने कपडे उतरवणे, अश्लील हावभाव किंवा महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली टिप्पणी यांचा समावेश आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले.
त्यावेळी 17 वर्षांच्या असलेल्या मुलीचा हात आरोपीने धरला होता आणि तिला उद्देशून ‘आय लव्ह यू’ असं म्हटलं असा आरोप होता. घाबरलेल्या त्या मुलीने सर्व प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत जाऊन या संदर्भात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. अखेर 2017 साली नागपूरच सत्र न्यायालयानेआरोपी तरूणाला भारतीय दंड संहिता तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले होते आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
मात्र उच्च न्यायालयाने ही शिक्षा रद्द केली. त्या मुलीचा लैंगिक छळ करण्याचा हेतू आरोपीचा होता असे दर्शवणारी कोणतीही परिस्थिती दिसून येत नव्हती.आय लव्ह यू म्हणणं हे लैंगिक हेचू दर्शवत नाहीत असे सांगत न्यायलयाने त्या इसमाची निर्दोष मुक्तता केली.