IMD Monsoon Update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाकडून मोठा इशारा

राज्यात 20 दिवसांपूर्वीच मान्सूनचं आगमन झालं होतं, मात्र पाऊस न पडल्यानं सर्वांचे डोळे पावसाकडे लागले होते, अखेर आता प्रतिक्षा संपली आहे, राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. आता या पार्श्वभूमीवर हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आला आहे.

IMD Monsoon Update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाकडून मोठा इशारा
पुढील 48 तासांमध्ये राज्यात जोरदार पावसाचा इशारा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 22, 2026 | 8:58 PM

जुनच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मान्सूनचं आगमन झालं होतं. त्यावेळी राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर पावसाला मोठा ब्रेक लागल्याचं पहायला मिळालं, जुन महिना संपत आला तरी  देखील महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. सोमवारी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान विभागाचा (IMD) नवा अंदाज समोर आला आहे. नव्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज? 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे,  मराठवाड्यासह, कोकण किनार पट्टी, आणि पुण्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढील 10 दिवस हे मान्सूनच्या वाटचालीसाठी अतिशय अनुकून असल्याचं हवामान विभागनं म्हटलं आहे. पुढील 48 तास हे मान्सूनसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, या काळात धाराशिव, पुणे, सोलापूर आणि कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणात मान्सून अडकला होता, परंतु  तो आता पुण्यात दाखल झाला आहे, मराठवाड्यातील दक्षिण भागापर्यंत मान्सून पोहोचला आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ञ एसडी सानप यांनी दिली आहे.

मात्र दुसरीकडे विदर्भात मान्सूनसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पहावी लागणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भाच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार आहे, तर काही भागांमध्ये हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सध्या जरी विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असलं तरी देखील मान्सूनच्या पावसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. चार ते पाच दिवसांनंतर मात्र विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज नाशिक, नागपूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

 

 

 

Follow Us