IMD Weather Update : महाराष्ट्राला पावसाचा हाय अलर्ट, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, नदी नाले एक होणार

राज्यात पुन्हा एकदा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे, दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस पडले असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

IMD Weather Update : महाराष्ट्राला पावसाचा हाय अलर्ट, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा, नदी नाले एक होणार
IMD Weather Update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 29, 2026 | 9:34 PM

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भासह कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या वतीने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये या काळात जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज?

अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे पुढील तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  या काळात पावसासोबतच जोरदार वारे देखील वाहणार आहे.  वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45 किमी इतका राहू शकतो. गेल्या  चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 37 मिलिमिटर इतक्या पावसाची नोंद झाली असून, गेल्या दोन महिन्यात सरासरीच्या 53 टक्के इतका पाऊस पूर्ण झाला आहे.

दरम्यान दुसरीकडे  कालपासून सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याची पहायला मिळत आहे.  हवामान खात्याने कोकण किनारपट्टीला 31 तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. सह्याद्री पट्ट्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळ आहे. कणकवलीतील संगम पॉईंट येथील नदीचे पात्र ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. नदीकाठच्या तसेच किनारपट्टीच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

गडचिरोलीला पावसाचा रेड अलर्ट  

गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून, जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून जिल्ह्यातील बाराही तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, मुख्य बाजारपेठ ठप्प झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने  हजेरी लावली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे सिंचनाची सोय नसलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतीच्या कामांना आता चांगलाच वेग येणार आहे, शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us