
यंदाच्या हंगामामध्ये देशभरात पावसाचं प्रमाण चांगलं राहिलं आहे. अनेक राज्यांमध्ये तर पूर परिस्थितीचा सामना करावा लागला, याचा सर्वात मोठा फटका हा पंजाबला बसला आहे, पुरामध्ये पंजाबचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरदरम्यान अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain Alert) आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवस उत्तर पश्चिम भारतामध्ये पावसाची शक्यता आहे. राजस्थान आणि दिल्लीमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पवासाचा अलर्ट देण्यात आला आहे. या काळात या राज्यांमध्ये वाऱ्याचा वेग प्रति तास 30-40 किमी एवढा राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे उत्तरपूर्व भारतामध्ये देखील हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, उत्तरपूर्व भारतामध्ये पुढील सात दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मेघालय, मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम भारतामध्येही पावसाचा इशारा देण्यात आला असून, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये पुढील सात दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतामधील राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
हवामान विभागाकडून महाराष्ट्राला 17 सप्टेंबरपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये पुढील सात दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून महाराष्ट्राला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.