IMD Weather Update : आज मुंबईत कधी पाऊस पडणार? महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस? वाचा पावसाबद्दलची महत्वाची अपडेट

IMD Weather Update : ऐन दिवाळीत पावसाने राज्यातील नागरिकांना हैराण करुन सोडलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मागचे दोन दिवस पाऊस कोसळत आहेत. हवामान विभागाने आज पावसाबद्दल काय अपडेट दिलेत ते जाणून घ्या.

IMD Weather Update : आज मुंबईत कधी पाऊस पडणार? महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस? वाचा पावसाबद्दलची महत्वाची अपडेट
rain forecast for Maharashtra & mumbai
| Updated on: Oct 23, 2025 | 8:05 AM

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये धुमाकूळ घालणारा पाऊस ऑक्टोंबर संपायला आला, तरी अजून पाठ सोडायला तयार नाहीय. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडत आहे. 21 ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी मुंबईत पाऊस कोसळला. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर काल 22 ऑक्टोबर रोजी पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळच्यावेळी नवीन कपडे घालून बाहेर पडण्याच्या, फटाके फोडण्याच्यावेळीच हा पाऊस बरसला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.

महाराष्ट्राच्या अनेक भागांसाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) यलो अलर्ट जारी केला आहे. त्या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे वारे वाहत असून राज्यातील हवामानात असे बदल दिसत आहेत. ऐन दिवाळीत पाऊस कोसळत आहे.

मुंबईत कधी कोसळणार पाऊस?

हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी म्हणून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण राज्यातील काही ठिकाणी अचानक वादळ किंवा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आज संध्याकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याणसह काही भागात मोकळ्या मैदानात आयोजित करण्यात आलेले दिवाळी पहाटचे कार्यक्रम रद्द करावे लागले. पाणी तुंबण्याइतका पावसाचा जोर नाहीय. पण चिखल होण्याइतका पाऊस कोसळतोय. त्यामुळे दिवाळीत नातेवाईक, मित्र परिवाराच्या भेटीला निघालेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. निदान दिवाळीत तरी, विश्रांती कर अशीच राज्यातील नागरिकांची वरुण राजाला विनंती आहे.

हवा खराब झाली

दुसरीकडे फटाक्यांमुळे मुंबईची हवा बिघडत चालली आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मंगळवारी मुंबईत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली. त्याचा थेट परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला. मंगळवारी मुंबईत हवा निर्देशांक तब्बल 211 इतका नोंदवला गेला.