राज्यपालासमोरच शेतकऱ्यांनी काढले प्रशासनाचे वाभाडे, शेतकऱ्याच्या प्रश्नांवर अधिकारी गोंधळले…
राज्यात दुष्काळ पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवाळीपूर्वी अग्रीम पाच हजाराची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. मात्र, ही मदत देखील मिळेनाशी झाली आहे. राज्याचे राज्यपाल धाराशिव येथील बलसूर येथे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांच्यासमोरच एका शेतकऱ्याने प्रशासनाचे वाभाडे काढल्याची घटना घडली आहे.

राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने दिवाळीपूर्वी अग्रीम 5 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पाच हजार रुपये जमा झालेले आहेत. परंतू काही शेतकऱ्यांना ही मदत अद्यापही मिळालेली नाही. एक कोटी शेतकऱ्यांना हे पाच हजार रुपये खात्यावर दिवाळी आधी मिळणे अपेक्षित होते. आता राज्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी धाराशीव येथे आलेल्या राज्यपालांसमोर एका सामान्य शेतकऱ्याने प्रशासनाचे वाभाडे काढल्याची घटना घडली आहे.
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या राज्यपालांसमोरच शेतकऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. ऊस पिकासाठी सिंचनाची व्यवस्था उभी करण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले, मात्र अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नाही. मग शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेला अडविणारा झारीतील शुक्राचार्य कोण? असा थेट सवाल बलसूर येथील शेतकरी गोविंद येळमे यांनी राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्यासमोर उपस्थित केला.
विशेष म्हणजे, राज्यपालांसमोर शेतकऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेचा कारभार मांडताच जिल्हाधिकारी आणि उपस्थित अधिकारीही काहीसे अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. दुष्काळात शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना योजनांचे अनुदान मिळवण्यासाठीही त्यांना प्रशासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. राज्यपालांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांनी केवळ दुष्काळाची व्यथा मांडली नाही, तर सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवरही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
उरलेल्या शेतकऱ्यांनाही मदत
दरम्यान, राज्याला मोठ्या दुष्काळाची झळ बसली आहे. दिवाळीत अग्रीम 5 हजार रुपयांची मदत राज्य सरकारने दिली आहे. सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना मदत झाली आहे. पण, दहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत हे पैसे आलेले नाहीत. त्यांना देखील मदत देण्यात येणार आहे.असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे. फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांना वसुलीसाठी छळत आहेत. या संदर्भात एक ऑडिओ देखील व्हायरल झाला होता. यावर सर्व बँकांनी दुष्काळामुळे वसुली थांबविली आहे. काही फायनान्स कंपन्या सक्तीने वसुली करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली असून संकटात फायनान्स कंपन्यांना लवचिक धोरण ठेवावे अन्यथा सरकार कारवाई करेल असा इशारा मंत्री भरणे यांनी दिला आहे.