धक्कादायक ! गॅस गिझरने एकाचा गुदमरून मृत्यू, तुम्हीही वापरताय? रहा सावध

गॅस गिझर (gas geyser) फुटल्याने एका युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धाक्कादायक घटना शहरातील सिडको परिसरात घडली. (gas geyser blast)

धक्कादायक ! गॅस गिझरने एकाचा गुदमरून मृत्यू, तुम्हीही वापरताय? रहा सावध
| Updated on: Jan 02, 2021 | 1:02 PM

नाशिक : गॅस गिझर (gas geyser) फुटल्याने एका युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धाक्कादायक घटना शहरातील सिडको परिसरात घडली. मृत युवकाचे नाव गौरव पाटील असे आहे. गौरव शुक्रवारी ( 1 जानेवारी) दुपारी अंघोळ करत असताना हा प्रकार घडला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. (in Nashik young boy died in blast of gas geyser)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (1 जानेवारी) गौरव पाटील त्याच्या घरात बाथरुममध्ये अंघोळ करत होता. यावेळी अचानक गॅस गिझरचा स्फोट झाला. त्यानंतर गौरवला गुदमरायला लागले. अचानकपणे घडलेल्या या प्रकारमुळे त्याचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी तत्काळ बाथरुमकडे धाव घेत गौरवला बाहेर काढले. त्याचे कुटुंबीय तसेच त्याच्या मित्रांनी त्याला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, श्वास घेण्यास जास्तच त्रास जाणवू लागल्यामुळे त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.

दरम्यान, गौरवच्या अशा अचानक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तसेच, गॅस गिझर वापरतना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

याआधी 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

गॅस गिझर फुटल्यामुळे, गॅस लीक झाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. मुंबईमध्ये मागील वर्षी जानेवारी महिन्यात गॅस लीक झाल्यामुळे 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. ध्रुवी गोहील असं मृत मुलीचं नाव होतं. ही मुलगी सकाळी अंघोळीला गेल्यानंतर एक तास होऊननी बाहेर आली नव्हती. तिच्या घरच्यांनी दरवाजा ठोठावूनही ध्रुवीने आवाज न दिल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढले होते. यावेळी बाथरुमच्या काचेवर चार फुटापर्यंत गॅस जमा झाल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले होते.

गॅस गिझर काय आहे ?

विशेषत: अंघोळ करण्यासाठी गॅस गिझरचा उपयोग होतो. इलेक्ट्रिक गिझरसारखीच गॅस गिझरचीही कार्यप्रणाली आहे . गॅस गिझरच्या खाली एक गॅस बर्नर लावलेले असते. याच बर्नरच्या साहाय्याने गॅस गिझरमध्ये पाणी गरम होते. गिझर चालू केल्यानंतर काही क्षणांत पाणी गरम व्हायला सुरुवात होते. पाणी गरम होण्याची ही प्रक्रिया अत्यंत जलद असल्यामुळे गिझरमध्ये दाब (pressure) निर्माण होते. हा दाब गिझरमध्ये जमा होऊ नये म्हणून गिझरला प्रेशर वॉल्व असतात. या वाल्वद्वारे गॅस गिझरमधील प्रेशर बाहेर पडते.

गॅस गिझरला पसंती का ?

इलेक्ट्रिक गिझरप्रमाणेच गॅस गिझरसुद्धा काम करते. यामध्ये पाणी अत्यंत जलद गतीने गरम होते. तसेच गरम पाण्याचा सतत पुरवठा (continuous flow) गॅस गिझर करते. या कारणांमुळे नागरिकांची गॅस गिझरला पसंती असते. हे गिझर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसवर ( Liquified Petroleum Gas, LPG) चालवले जाते.

काय काळजी घ्याल?

>>> गॅस गिझरमधून निघणारा कार्बन मोनॉक्साईड हा गॅस शरीरासाठी हानिकारक असतो. तो रंगहीन असल्यामुळे गॅस गिझर लीक झालेले कळूनही येत नाही. त्यामुळे गॅस गिझर लीक झाल्याची थोडी जरी शंका आली तर गॅस गिझर बंद करावे.

>>> कार्बन मोनॉक्साईड श्वासावाटे शरीरात गेल्यामुळे काही मिनिटांत चक्कर येते. अशी काही लक्षणं आढळल्यास तत्काळ बाथरुमच्या बाहेर यावे.

>>> गॅस गिझर लावताना बाथरुममध्ये मोकळी जागा आणि नैसर्गिक हवा येण्यासाठी जागा आहे का?, याची चाचपणी करावी. तसेच, बाथरुम मोठे असेल तरच गॅस गिझर लावावे.

>>> बाथरुममध्ये जाण्यापूर्वी गॅस गिझर बंद केलेलं होतं का याची खात्री करुन घ्या.

>>> कार्बन मोनॉक्साईड शरीरात गेल्यानंतर घरगुती उपाय करण्यापेक्षा रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करा.

>>> रुग्ण बेशुद्ध पडल्यानंतर त्याला तुमच्या तोंडावाटे श्वास (mouth-to-mouth breathing) देण्याचा प्रयत्न करु नाका. कारण त्यामुळे तुम्हाच्याही शरीरात कार्बन मोनॉक्साईट हा वायू जाण्याची शक्यता असते.

संबंधित बातम्या :

रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तन्वीला हुंड्यासाठी मारण्याचा प्रयत्न? सासरच्यांवर आरोप

(in Nashik young boy died in blast of gas geyser)