
राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करुन बलात्कार केलेल्या अशोक खरात विरोधात 11 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच त्याचे बड्या नेत्यांसोबत असलेले राजकीय कनेक्शन देखील समोर आले आहे. आज अशोक खरात कोर्टात हजर करण्यात आले. आता कोर्टाने काय निर्णय घेतला हे समोर आले आहे.
भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरात याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. कोर्टाने खरातविरुद्धचे आरोप अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्टपणे सांगितले. न्यायाधीशांनी केस डायरीचा अभ्यास केल्यानंतर म्हटले की, “तपासात प्रगती दिसत असली तरी आरोपीने एकसारखाच गुन्हा वारंवार केलेला आहे. अनेक महिलांवर त्याने अत्याचार केले आहेत.”
कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षणदेखील समोर आले आहे. निकालाचे वाचन सुरू असताना न्यायालयाने रिमांड रिपोर्टचा उल्लेख करताना सांगितले की, तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक महत्त्वाच्या गोष्टी अद्याप तपासायच्या बाकी आहेत. आरोपीने एकाच प्रकारचा गुन्हा अनेक पीडितांवर केला आहे. त्यामुळे आरोपीला १ तारखेपर्यंत म्हणजे ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कोर्टाने काय म्हटले?
कोर्टाने आपल्या निरीक्षणात स्पष्टपणे नमूद केले की, “आरोपीविरुद्धचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. आरोपीने एकसारखा गुन्हा वारंवार केला असून, अनेक पीडितांवर अत्याचार केले आहेत. तपास अजून पूर्ण झालेला नसल्याने आरोपीला पोलीस कोठडी देणे आवश्यक आहे.” या निर्णयानंतर खरातला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आणि अनेक पीडित समोर येत असल्याने या प्रकरणाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आता पोलिसांना ४ दिवसांत आणखी पुरावे गोळा करून तपास पूर्ण करण्याची जबाबदारी आहे.