
‘संपूर्ण इतिहासात कोणतेही क्षेत्र काढून बघा, त्यात चित्तपावन समाजाची लोकं दिसतात
स्वातंत्र्य चळवळ, कला आणि साहित्य क्षेत्र बघा त्यातील 10 नावं काढले तर त्यात 3-4 नावं चित्तपावन समाजाची असतात. राजकीय क्षेत्रात संख्या महत्त्वाची असते, ब्रह्मण बोटावर मोजण्या इतके, पण ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेसारखं असतं’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये परशुराम भवनचं उद्घाटन झालं, या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. चित्तपावन ब्राह्मण संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
चित्तपावन ब्राह्मण संघाचे अभिनंदन, अतिशय सुंदर भवन उभारलं आहे, त्याच्या उद्घाटनाची संधी मला दिली त्याबद्दल आभार, हॉस्टेलसुद्धा उभारले आहे. अमृत स्नानाच्या तारखांची आज घोषणा करायची होती, त्यासाठी आलो होतो. 93 वर्षे सातत्यानं ही संघटना काम करत आहे. 1933 ला जी सभा झाली होती, त्याचे सुद्धा इतिवृत्त इथं वाचायला मिळालं. गरजू लोकांना मदत करता आली पाहिजे, संपूर्ण इतिहासात कोणतेही क्षेत्र काढून बघा, त्यात चित्तपावन समाजाची लोकं दिसतात. स्वातंत्र्य चळवळ, कला आणि साहित्य क्षेत्र बघा त्यातील 10 नावे काढले तर त्यात 3-4 नावं चित्तपावन समाजाची आहेत, गरीब घरातून पुढे आलेली ही लोकं आहेत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जातीय व्यवस्था असू नये असे वाटते, पण जात कधीच जात नाही.
जातीय विषमता नसावी असे वाटते, राजकीय क्षेत्रात संख्या महत्त्वाची असते. ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी पण ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेचं, चिमूटभर साखर टाकली तरी गोडवा तयार करण्याचं काम, आपले ऐतिहासिक योगदान राहिले आहे, ते यापुढे राहील. आपल्या मुलांवर तसे संस्कार करावे, अनेकांनी दान केले आहेत ते महत्वाचे, इतर काही ठिकाणी फक्त काही लोकं पुढे जातात, पण जे पुढे गेले त्यांनी इतरांना पुढे घेऊन जायचे आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.