
लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपये मिळणार अशी चर्चा आहे. विरोधकांकडून तसा प्रचार केला जातोय. त्यावर आता सरकारकडून राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “लाडकी बहिण योजेनेच्या माध्यमातून महिलांना लाभ द्यायचा होता. आधी खुप गर्दी सरकारी कार्यालयात झाली असती. सुधारीत शासन निर्णय काढला आणि त्यामुळे करोडो महिलांना त्याचा लाभ झाला. महिलांनी आम्हाला निवडून दिले. कुठल्याही महिलेवर गुन्हा दाखल केलेला नाही कुठल्याही महिलेकडून वसुली केलेली नाही, तरी विरोधक खोटा भ्रम पसरवत आहेत. त्यांचा हा प्रचार आहे. ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा होईल, बदल होईल तेव्ही ही बाब वेबसाइटवर येईल. तेव्हा या संबंधी प्रश्न विचारणं योग्य ठरेल” असं राज्य मंत्री आशिष जयस्वाल म्हणाले.
“कोणत्याही शासन निर्णयात बदल झालेला नाहीये. कोणत्याही अटी बदललेल्या नाहीत. नियमबाह्य ज्यांनी लाभ घेतलाय, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. श्रीमंत महिलांनी देखील लाभ घेतलाय. सरकारने कोणावरही गुन्हा दाखल केला नाही. वसुली केली नाहीये. जीआरनुसार जे पात्र लाभार्थी आहेत, त्यांना पैसे मिळत राहतील” असं आशिष जयस्वाल यांनी सांगितलं.
2100 रुपये कधी मिळणार?
सरकारने लाडकी बहिण योजनेत 2100 रुपये देण्याच आश्वासन दिलं होतं. त्या बद्दलही आशिष जयस्वाल बोलले. “सरकारच्या महसूली जमेमध्ये दरवर्षी वाढ होत असते. सरकारच उत्पन्न दरवर्षी वाढतं. जेव्हा सरकारच उत्पन्न वाढतं, तेव्हा तरतूद वाढवली जाते. सरकारच उत्पन्न वाढल्यानंतर नमो शेतकरी, संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहिण योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना टप्याटप्याने निवडणुकीपूर्वी जी वचन दिली होती, त्याची पूर्तता करु” असं आशिष जयस्वाल म्हणाले.
‘याची इतिहासात नोंद घेतली जाणार’
“असंख्य योजना आम्ही आणल्या. याची इतिहासात नोंद घेतली जाणार आहे. आपल्या उत्पन्नापेक्षा आपण नेहमीच जास्त खर्च करतो. वित्तीय मर्यादा मोडल्या नाहीत. सर्वांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. विभागांची मागणी जास्त असते. अशी तक्रार झाली असेल मला वाटत नाहीये” असं आशिष जयस्वाल एकनाथ शिंदे यांच्या अर्थ खात्याच्या तक्रारीविषयी म्हणाले.