
इराण-इस्रायल-अमेरिकेच्या या संघर्षाचा भारतासह अनेक देशांना त्रास होत आहे. या तिन्ही देशांमघ्ये युद्ध पेटल्याने सर्वकाही विस्कळीत झालं आहे. एवढंच नाही तर, याकाळात अनेकांची फसवणूक देखील होत आहे. डोंबिवलीत महिलेला बिल न भरल्यास कनेक्शन कापू असा मेसेज पाठवून भामट्याने महिलेला घातला 3 लाखांचा गंडा घातला आहे. गॅस टंचाईच्या भीतीचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांची नवी मोडस ऑपरेंडी सुरु केलीये. डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरु आहे.
एकीकडे अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे, नागरिक गॅस मिळवण्यासाठी एजन्सीबाहेर रांगा लावत आहेत. मात्र, याच संधीचा फायदा आता सायबर भामट्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. गॅस कनेक्शन कापले जाण्याच्या भीतीपोटी नागरिक घाईघाईत पावले उचलत आहेत आणि नेमका हाच फायदा घेत डोंबिवलीत एका महिलेला ३ लाखांचा गंडा घातला गेला आहे. ‘महानगर गॅस’चे बिल भरले नसल्याची भीती दाखवून ही लूट करण्यात आली असून या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
जागतिक स्तरावर अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे भारतात गॅस पुरवठा कमी झाल्याच्या बातम्यांनी नागरिक आधीच चिंतेत आहेत. याच चिंतेचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी आता आपली ‘मोडस ऑपरेंडी’ बदलली आहे. डोंबिवलीतील एका नोकरदार महिलेला “गॅस कनेक्शन कापले जाईल” अशी भीती दाखवून तब्बल 2 लाख 99 हजार 500 रुपयांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
डोंबिवलीतील सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या स्मिता राणे या नोकरदार महिलेच्या पतीला गेल्या आठवड्यात एक एसएमएस (SMS) आला. “तुम्ही भरलेले महानगर गॅसचे देयक आमच्याकडे दिसत नाहीये, त्वरित अपडेट न केल्यास गॅस जोडणी बंद होईल,” असा इशारा या संदेशात होता. गॅसचा तुटवडा आधीच असल्याने भीतीपोटी स्मिता यांनी संदेशातील नंबरवर संपर्क साधला.
भामट्याने स्मिता यांना विश्वासात घेतले की, तांत्रिक कारणास्तव त्यांचे बिल दिसत नाहीये आणि त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करावी लागेल बोलता बोलता त्याने एक लिंक (Link) पाठवली. ती उघडल्यानंतर स्मिता यांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती भरली. त्या नंतर प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे भासवून भामट्याने त्यांना फोनवर गुंतवून ठेवले.
त्याच वेळी त्यांच्या क्रेडिट कार्डमधून 2 लाख आणि डेबिट कार्डमधून 99 हजार 500 रुपये असे एकूण 3 लाख रुपये लंपास केले. बँकेचे मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे स्मिता राणे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे.
आतापर्यंत गुंतवणुकीच्या नावाखाली लुटणारे भामटे आता थेट गॅस जोडणीच्या नावाने फसवणूक करू लागल्याने ग्राहकांमध्ये भीती पसरली आहे. इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली नागरिक आधीच आक्रमक असताना अशा सायबर हल्ल्यांमुळे खळबळ उडाली आहे.