टिक टिक टिक… पार्क केलेल्या कारमधून सतत येत होता आवाज, बॉम्बच्या भीतीने पळापळ, पण सत्य काही वेगळंच !
एका कारमध्ये बॉम्ब आहे की काय अशा शंकेमुळे नागरिकांची एकच त्रेधातिरपीट उडाली होती, मात्र पोलीस आणि बॉम्बशोधक पथक आल्यावर त्यांनी शोध घेतला असता जे सत्य समोर आलं...

भारत -पाकिस्तान तणावादरम्यान पाकड्यांकडून अनेक कुरापती केल्या जात असून त्याच पार्श्वभूमीवर सध्या देशभरात हाय अलर्ट असून सुरक्षा व्यवस्थेतही कडक वाढ करण्यात आली आहे. पोलीस तर चोख लक्ष देत आहेतच. पण नागरिकांनाही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. याचदरम्यान जळगावमध्ये एका कारमध्ये बॉम्ब आहे की काय अशा शंकेमुळे नागरिकांची एकच त्रेधातिरपीट उडाली होती, मात्र पोलीस आणि बॉम्बशोधक पथक आल्यावर त्यांनी शोध घेतला असता सत्य काहीतरी वेगळंच निघालं. आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. नेमकं घडलं तरी काय, जाणून घेऊया.
जळगावच्या रेल्वे स्थानक परिसरात उभे असलेल्या एका गाडीमध्ये बॉम्ब असल्याच्या माहितीने मोठी खळबळ उडाली होती. रेल्वे स्टेशन परिसराक उभ्या असलेल्या एका कारमधून टिक टिक टिक.. असा घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सतत आवाज येत होता. ते लक्षात येताच नागरिकांची घाबरगुंडी उडाली. कारमधून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बाहेर पडत असलेल्या आवाजामुळेच परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली. अखेर उपस्थितांपैकी कोणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर जळगाव जिल्हा पोलिस दलाचे बॉम्ब शोध नाशक पथक व कर्मचारी ताडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्याकडून तपासणी करण्यात आली. सतत आवाज येणारे हे वाहन जळगाव रेल्वे स्थानकावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उभे असल्याची माहिती समोर आली. त्याची बॅटरी संपल्यामुळे असा आवाज येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी खबरदारी तसेच काळजी म्हणून सदरचा परिसर रिकामा केला, क्षणात तो निर्मनुष्य करण्यात आला होता.
दरम्यान उभ्या कारचे इंडिकेटर चालूच राहिल्यामुळे तसा आवाज येत होता मात्र बॉम्बशोधक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कारची काच फोडून तपासणी केली आणि गाडीचा इंडिकेटर बंद केला, त्यानंतर मात्र हा आवाज बंद झाला. कारमध्ये कुठलाही बॉम्ब नसून उभ्या असलेल्या कारचे इंडिकेटर सुरूच राहिल्यामुळे हा आवाज येत असल्याची माहिती समोर आली आणि उपस्थितांपैकी सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे कारमधील काचेसमोर पोलीस नावाची पाटी असून एका महिलेच्या नावावर ही कार असल्याची माहिती समोर आली आहे. पंचनामा करून पोलिसांनी ही कार पुढील कारवाईसाठी जप्त केली आहे. काही क्षणांसाठी सर्वांचीची भीतीने घाबरगुंडी उडाली होती. पण सत्य समोर आल्यावर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.