जळगाव महापालिकेत महापौर-उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला, कोणाची वर्णी?

जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महायुतीच्या १० महिन्यांच्या विशेष फॉर्म्युल्याबाबत सविस्तर जाणून घ्या.

जळगाव महापालिकेत महापौर-उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला, कोणाची वर्णी?
Jalgaon Municipal Corporation
| Updated on: Feb 03, 2026 | 8:16 AM

राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापौर कोण होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला काळे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांच्या नावावर महायुतीने शिक्कामोर्तब केले आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, या पदांसाठी अन्य कोणाचेही अर्ज न आल्याने ही निवड बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

या निवडीपूर्वी जळगावमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह महायुतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. महायुतीमधील समन्वय कायम राखण्यासाठी आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडे महापौर तर शिवसेनेकडे उपमहापौर पद देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

10 महिन्यांचा फॉर्म्युला काय?

या निवडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पदाचा कालावधी. आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महायुतीमधील जास्तीत जास्त नगरसेवकांना कामाची संधी मिळावी, या उद्देशाने १० महिन्यांचा विशेष फॉर्म्युला राबवण्याचे संकेत आहेत. त्यानुसार, दीपमाला काळे यांच्यानंतर इतर इच्छुकांनाही संधी दिली जाऊ शकते. या फॉर्म्युलाची अंमलबजावणी आणि पुढील फेरबदल याचे सर्व अधिकार मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.

बिनविरोध निवडीमुळे विरोधकांपुढे आव्हान

महापौर आणि उपमहापौर या दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने विरोधकांनी या शर्यतीतून माघार घेतल्याचे चित्र आहे. महायुतीच्या या एकजुटीमुळे जळगाव महापालिकेवर आता पूर्णपणे भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. दीपमाला काळे यांच्या रूपाने जळगावला अभ्यासू महिला नेतृत्व मिळाले आहे, तर मनोज चौधरी यांच्या निवडीमुळे शिवसेनेची ताकद शहरात वाढणार आहे.

निवडीची अधिकृत प्रक्रिया

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत पीठासीन अधिकारी या दोन्ही नावांची अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर आपला पदभार स्वीकारतील, अशी माहिती समोर येत आहे.