ट्रॅक्टर थेट घरात शिरला, चिमुकली जिवानीशी गेली; अपघात नेमका कसा घडला ऐकून काळजात धस्स होईल !

भरधाव वेगात जात असताना ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारी असलेल्या वस्तीत घुसला. यानंतर पुढे जे घडले ते दुर्दैवी.

ट्रॅक्टर थेट घरात शिरला, चिमुकली जिवानीशी गेली; अपघात नेमका कसा घडला ऐकून काळजात धस्स होईल !
जळगावमध्ये अनियंत्रित ट्रॅक्टर घरात घुसला
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 05, 2023 | 5:10 PM

जळगाव / अनिल केऱ्हाळे : भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या शेजारी असलेल्या झोपड्यांमध्ये घुसला. यात 11 वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. भडगाव तालुक्यातील आमडदे येथे ही घटना घडली. चिमुकलीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

भडगाव तालुक्यात वाळूची चोरटी वाहतूक सुरु आहे. वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आमडदे येथील गणपती नगरातल्या वस्तीतून जात होता. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर ट्रॅक्टर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या वस्तीत शिरला. यात तीन ते चार घरं उद्धवस्त झाली आहेत. तर घरातील 11 वर्षाच्या चिमुरडीला जोरदार धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन महिला जखमी झाल्या.

घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरार

बानूबाई वाघ आणि पिंकी सोनवणे अशी जखमी महिलांची नावे आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर दोषी ट्रॅक्टर चालक घटनास्थळी आपले वाहन सोडून फरार झाला आहे. या दुर्घटनेतील ट्रॅक्टरमध्ये वाळू भरलेली नसली तरी कुठे तरी वाळू खाली केल्याचे दिसून येत आहे. वाळू खाली केल्यानंतर भरधाव वेगाने ट्रॅक्टर पळवल्यामुळे ही भयंकर घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.