ना उमेदवारांची घोषणा, ना एबी फॉर्म; एकनाथ शिंदे नेमके आहेत तरी कुठे? शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास ३८ तास उरले असताना शिंदे गटाने अद्याप उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले नाहीत. जागावाटपाच्या तिढ्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला आता केवळ ३८ तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ सुरु आहे. सध्या सर्वच पक्ष, उमेदवार यांची लगबग शिगेला पोहोचली आहे. मात्र, या धावपळीत शिवसेना शिंदे गट अजूनही बॅकफूटवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप, ठाकरे गट, मनसे यांसह इतर प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या हाती अधिकृत एबी फॉर्म सोपवून उमेदवारी जाहीर केली आहे. पण शिंदे गटाकडून अद्याप एकाही उमेदवाराला अधिकृत फॉर्मचे वाटप करण्यात आलेले नाही. यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असलेल्यांचा पत्ता ऐनवेळी कट होणार की काय? अशी भीती अनेकांना वाटत आहे.
शिवसेनेची गळचेपी
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाने महायुतीमध्ये १२५ जागांसाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, सध्याच्या चर्चेनुसार त्यांच्या पदरात केवळ ८० ते ८७ जागा पडण्याची शक्यता आहे. या कमी पडलेल्या जागांमुळे पक्षामध्ये अंतर्गत नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे. महायुतीत नेहमीच शिवसेनेची गळचेपी होत आहे अशीही कुजबुज सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. एकीकडे शिवसेनेचे उमेदवार एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत असताना भाजपने मात्र मुंबईत जोरदार आघाडी घेतली आहे.
शिंदे गटातील इच्छुकांची धाकधूक वाढली
भाजपकडून ६६ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यांनी अर्ज भरण्यास सुरुवातही केली आहे. यामध्ये तेजस्वी घोसाळकर, नील सोमय्या, मकरंद नार्वेकर आणि रवी राजा यांसारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे. वॉर्ड क्रमांक २ मधून तेजस्वी घोसाळकर, वॉर्ड १०७ मधून नील सोमय्या आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले अनुभवी नेते रवी राजा यांनी वॉर्ड १८५ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय कुलाबा आणि दक्षिण मुंबईचा बालेकिल्ला राखण्यासाठी वॉर्ड २२६ मधून मकरंद नार्वेकर आणि वॉर्ड २२७ मधून हर्षिता नार्वेकर यांनीही आपले अर्ज भरून निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपच्या या वेगवान हालचालींमुळे शिंदे गटातील इच्छुकांची धाकधूक अधिकच वाढली आहे.
त्यातच आता उद्या (३० डिसेंबर) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आपला वॉर्ड आपल्याकडे राहतो की मित्रपक्षाकडे जातो? या विचाराने शिंदे गटाच्या इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. सध्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरू असून आज रात्रीपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप होण्याची शक्यता आहे. मात्र, या विलंबाचा परिणाम प्रचारावर होण्याची भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे.
