LPG Shortage: गॅस सिलेंडर गोडाऊनवरच दरोडा, जालन्यात रात्रीच्या अंधारात घडलं काय? महाराष्ट्रात कुठे कुठे काळाबाजार? किती जणांवर गुन्हे?

Jalna Gas Cylinder Theft News: गॅस सिलेंडरच्या तुटवडा नसल्याच्या बाता सरकार मारत असले तरी वास्तविक परिस्थिती ही गॅस एजन्सीबाहेर दिसून येत आहे. त्यातच घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याचे छापेसत्रावरून समोर येत आहे. तर आता गॅस सिलेंडरचे गोडाऊन फोडण्यापर्यंतची मजल गेली आहे. जालन्यात रात्रीच्या अंधारात घडलं काय?

LPG Shortage:  गॅस सिलेंडर गोडाऊनवरच दरोडा, जालन्यात रात्रीच्या अंधारात घडलं काय? महाराष्ट्रात कुठे कुठे काळाबाजार? किती जणांवर गुन्हे?
एलपीजी सिलेंडर चोरीला
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 10:16 AM

Jalna Gas Cylinder Theft News: जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जालन्यातील उटवद शिवारातील एका गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून तब्बल 110 गॅस सिलेंडर चोरीला गेले आहे. उटवद शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून 96 घरगुती गॅस सिलेंडरसह 12 व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर आणि दोन पाच किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आढाव यांच्या फिर्यादीवरून प्रकरणात मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गॅस सिलिंडर टंचाईच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर गॅस एजन्सी आणि गोडाऊनला पोलीस संरक्षण देण्याची मागणी रेटण्यात येत आहे.

भोकरदन मध्ये 8 तर घनसावंगीत 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त

जालन्यातील घनसावंगी आणि भोकरदन शहरात पुरवठा विभागाने अवैध गॅस वापरांविरोधात धडक मोहीम राबवत आज 27 धाडी टाकत भोकरदन शहरात आठ घरगुती गॅस सिलेंडर तर घनसावंगी मध्ये 7 घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले.घनसावंगी परिसरातील हॉटेल,रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनांची अचानक तपासणी केली.यावेळी व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडर वापर होत असल्याचे आढळून आले होते.या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत 15 सिलिंडर जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. दरम्यान मागच्या काही दिवसापासून पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायामध्ये वापरणाऱ्या विरोधात कडक कारवाईची मोहीम हाती घेतली.

साडेचार लाखांपेक्षा अधिकचे सिलेंडर चोरीला

या चोरीला गेलेल्या सिलेंडरची अंदाजे किंमत साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. या मोठ्या चोरीने गॅस एजन्सी मालकांना धडकी भरली आहे. उटवद शिवारातील गोडाऊनचे कुलूप चोरट्यांनी तोडले आणि 110 गॅस सिलेंडर लंपास केले. रविवारी रात्री गॅस एजन्सी बंद केल्यानंतर मध्यरात्री हा प्रकार घडला. सोमवारी ही बाब समोर आली. 110 गॅस सिलेंडर लंपास करण्यात आली. त्यातील 96 घरगुती गॅस सिलेंडर तर 12 निळ्या रंगाची व्यावसायिक सिलेंडर होती. पण यावेळी गोडाऊनवर सुरक्षा रक्षक अथवा कर्मचारी नव्हते का, असा सवाल करण्यात येत आहे. पोलीस याप्रकरणात पुढील तपास करत आहेत.

घरगुती गॅसचा गैरवापर, तिघांना अटक

वसईत घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायासाठी वापरणाऱ्या हॉटेलवर धडक कारवाई करण्यात आली आहे. वसई पूर्वेतील नवजीवन परिसरातील लजिज हॉटेलवर पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांच्या पथकाने धाड टाकून ही कारवाई केली आहे.तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर वापरून स्वयंपाक केला जात असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच पेट्रोलियम कायद्यान्वये तीन जनावर गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा

नाशिक शहरात गॅस सिलिंडरच्या संशयास्पद साठ्याचा मोठा प्रकार उघडकीस आला असून त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात पुरवठा विभाग व सातपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विनापरवाना सिलिंडरने भरलेला ट्रक जप्त केला. कारवाईदरम्यान एचपी गॅसचे ५०० हून अधिक सिलिंडर रस्त्यावर साठवून ठेवलेले आढळून आले. त्यामुळे गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच ठिकाणी उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडरचाही मोठा साठा आढळला. पोलिसांनी दोन्ही ट्रक तसेच एक रिक्षा ताब्यात घेत चालक व संबंधित व्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या साठ्यामागे काळाबाजाराचे रॅकेट आहे की अन्य कारण, याबाबत सध्या सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

चाकणच्या HPCL गेटवरच गॅसचा काळाबाजार; ट्रकमधून सिलेंडर विक्री कॅमेऱ्यात कैद

चाकण औद्योगिक क्षेत्रात गॅस टंचाईमुळे उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि कामगारांचे जीवन आधीच कोलमडलेले असतानाच चाकणच्या HP गँस कंपनीच्या गेटवर रांगेत उभ्या गॅस ट्रकमधूनच सिलेंडर बाहेर काढून सर्रास काळाबाजार केला जात असल्याचे उघड झाले. कंपनीच्या गेटसमोर रांगेत उभ्या असलेल्या गॅस ट्रकमधूनच सिलेंडर बाहेर काढून सर्रास काळाबाजार केला जात असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ट्रकमधून काढलेले सिलेंडर घेऊन तीन तरुण घटनास्थळावरून पळून गेले, आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ज्या ठिकाणी गॅसचा अधिकृत पुरवठा व्हायला हवा, त्याच ठिकाणी चालकांकडूनच काळाबाजार होत असल्याने संपूर्ण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. एकीकडे गॅसअभावी हॉटेल बंद होण्याच्या उंबरठ्यावर, उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर, आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे काळाबाजार खुलेआम सुरू असल्याचे चित्र संतापजनक आहे.HPCL कंपनीच्या गेटवरच हा प्रकार घडत असल्याने प्रशासन आणि कंपनीच्या देखरेखीवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. आता प्रश्न एकच हा काळाबाजार थांबवणार कोण? आणि जबाबदारांवर कारवाई कधी होणार?

कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की

अमरावतीच्या दर्यापूरमध्ये अवैध सिलेंडर वापरावर कारवाई केल्या प्रकरणी मंडळ अधिकार्‍याला धक्काबुक्की केल्याचे प्रकरण समोर आले होते. मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी दर्यापुरात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दर्यापूरमध्ये अंजनगाव टी पॉईंट वर एका हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याने महसूल पथकाकडून कारवाई आली होती. यावेळी हॉटेलमधल्या लोकांनी कारवाई करणाऱ्या अधिकार्‍याला धक्काबुक्की केली होती.

Follow Us