
संजय सरोदे, Tv9 मराठी, जालना | 16 नोव्हेंबर 2023 : “आम्ही समाजाचा आशीर्वाद घेऊन पुढे चालतोय. समाजाची 10 माणसं असली तरी आम्ही थांबतो किंवा 50 हजारांचा जनसमुदाय असला तरी थांबतो. आज दौंडमध्ये आणि वरगड गावात प्रचंड लोकं होती. मैदानात उभं राहायला जागा नव्हती, इतकी गर्दी होती. मराठा समाजाच्या नागरिकांची भूमिका योग्य आहे. नागरिकांना वाटतंय की, आपल्या लेकरांना आता आरक्षण मिळणार आहे. अर्थात आता शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा समाज ताकदीने एकत्र यायला लागला आहे. कोणत्याही नेत्याने कितीही संभ्रम निर्माण केला की, आरक्षण मिळणार नाही. पण शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मला याची पूर्ण खात्री आहे”, असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
ओबीसी नेत्यांकडून भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक बडे नेते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. “मी गोरगरीब लेकरांसाठी लढतोय. माझा समाज गोरगरीब लेकरांसाठीच लढतोय. आम्ही काही वाईट करत नाहीत. आमचा समाज आतापर्यंत कोणाच्याही विरोधात वाईट बोलत नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर मग आम्ही सोडणार नाहीत”, असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला.
“ओबीसी समाजाचा आरक्षणासाठी अधिकार आहे. त्यांचा त्यांच्या आरक्षणावर अधिकार आहे. लोकशाही आहे. आम्हाला काहीच दु:ख नाही. त्यांनी बिंधास सभा घ्याव्यात. फक्त गोरगरीब मराठा लेकरांचा विचार करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. आम्ही नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. या दरम्यान त्यांच्या सातारा जिल्ह्यातील सभेवरुन वाद निर्माण झाला होता. साताऱ्यातील शिवतीर्थ मैदानावर मनोज जरांगे यांची सभा भरवण्यात येऊ नये, अशी मागणी मराठा नेते तेजस्वी चव्हाण यांनी केली होती. विशेष म्हणजे त्यांनी त्यासाठी उपोषणाचादेखील इशारा दिला होता. त्यानंतर साताऱ्यातील गांधी मैदानात मनोज जरांगे यांची सभा होईल, असं जाहीर करण्यात आलं आहे.