मोठी बातमी! प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच जयंत पाटील यांना बड्या पक्षाची ऑफर, पडद्यामागे घडामोडींना वेग

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, त्यानंतर आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.

मोठी बातमी! प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच जयंत पाटील यांना बड्या पक्षाची ऑफर, पडद्यामागे घडामोडींना वेग
_Jayant Patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2025 | 2:49 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भात संकेत देखील दिले होते. त्यानंतर आता त्यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली होती, राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. मात्र जयंत पाटील हे शरद पवारांसोबत राहिले. अनेकदा जयंत पाटील हे भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा देखील रंगली मात्र जयंत पाटील यांनी प्रत्येकवेळी या चर्चेचं खंडण केलं.

मात्र त्यानंतर पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले होते. मला पक्षानं संधी दिली, सात वर्ष मला दिले, आता नव्या चेहऱ्यांना संंधी देणं गरजेचं आहे, असं मत त्यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर त्यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  दरम्यान जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संग्राम जगताप यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले संग्राम जगताप?   

जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ जयंत पाटील अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचं स्वागतच करतील, जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नसताना अनेक वेळा त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. जयंत पाटील हे राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहेत, असं बोललं जायचं, अस्वस्थपणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे,’ असं जगताप यांनी म्हटलं आहे.