Jaykumar Gore: ‘भोंदू बाबांचं औषध कामी आलं नाही, आता अघोरी बाबांचं औषध…’ जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंना खोचक टोला, जखमांची उपमा देत डिवचलं

Jaykumar Gore On Shambhuraj Desai: सातारा जिल्हा बँकेत शंभूराज देसाईंनी मोठी खेळी केली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याचे दिसून आले आहे. यानंतर जयकुमार गोरेंनी सूचक टोला लगावला.

Jaykumar Gore: भोंदू बाबांचं औषध कामी आलं नाही, आता अघोरी बाबांचं औषध... जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंना खोचक टोला, जखमांची उपमा देत डिवचलं
Jaykumar Gore Targets Shambhuraj Desai
| Updated on: Nov 18, 2026 | 10:26 PM

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तास्थापनेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. बँकेच्या संचालक मंडळात भाजपचे सर्वाधिक संचालक निवडून आलेले असतानाही अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शंभूराज देसाई यांना यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत हातमिळवणी करत त्यांनी सत्तेचं गणित जुळवलं. त्यामुळे साताऱ्यात भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर जयकुमार गोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सूचक टोला लगावला आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या एकूण 21 संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 9 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 8 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 संचालक निवडून आले होते. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचाच उमेदवार विराजमान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीत शंभूराज देसाई यांनी अनपेक्षित डाव टाकला.

Loading...

शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोबत घेत बहुमताचं गणित जुळवलं. या राजकीय समीकरणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची अध्यक्षपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सर्वाधिक संचालक असूनही भाजपला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदापासून दूर राहावं लागलं. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

या सत्तास्थापनेनंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सूचक शब्दांत टीका केली. काही लोकांच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत, असं म्हणत त्यांनी राजकीय टोला लगावला. वरून जरी जखम भरलेली दिसत असली, तरी आतून त्या जखमा तशाच आहेत. काही लोक भोंदू बाबांकडून चमत्कारिक औषध घेतात. मात्र त्यातून त्या जखमा बऱ्या होत नाहीत. अघोरी बाबांकडून घेतलेल्या औषधाचे परिणाम काय होतील, ते पाहावं लागेल, असं गोरे म्हणाले.

जयकुमार गोरेंच्या या विधानामुळे सातारा जिल्हा बँकेतील सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षाला नवा आयाम मिळाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा वचपा शंभूराज देसाईंनी जिल्हा बँकेच्या सत्तास्थापनेत काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता गोरेंच्या या सूचक टीकेला शंभूराज देसाई काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us