
नांदेडच्या राजकीय वर्तुळात सध्या एका खळबळजनक घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर घोगरे पाटील यांनी थेट आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव घेत त्याच्यावर आरोप केल्याने जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. मात्र प्रताप चिखलीकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यात आपले नाव विनाकारण गोवले जात असल्याचे म्हटले आहे.
नांदेडमधील सिडको परिसरातून जीवन घोगरे पाटील यांचे काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. घोगरे पाटील यांच्या दाव्यानुसार, त्यांना अज्ञात स्थळी नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत त्यांची या संकटातून सुटका केली. सुटकेनंतर पत्रकारांशी बोलताना घोगरे पाटील यांनी गंभीर आरोप केले. आर्थिक व्यवहार आणि राजकीय वैमनस्यातून आमदार प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी हे अपहरण घडवून आणले, असा दावा त्यांनी केला.
जीवन घोगरे पाटील यांच्या आरोपानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तातडीने आपली बाजू मांडली. ते म्हणाले, मला या घटनेची सुरुवातीला काहीच कल्पना नव्हती. उलट, जीवन घोगरे यांचा मुलगा दिग्विजय याचा मला फोन आला होता. त्याने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. त्यांन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली. ज्याच्या मुलाला मी मदत केली, तोच व्यक्ती माझ्यावर आरोप करत आहे हे दुर्दैवी आहे, असे प्रताप चिखलीकर म्हणाले.
प्रताप चिखलीकर यांनी घोगरे पाटील यांच्या आर्थिक व्यवहारांकडे बोट दाखवले आहे. “माझा आणि घोगरे पाटील यांचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही. मात्र, त्यांचे मार्केटमध्ये अनेकांशी व्यवहार आहेत. अनेकांचे पैसे देणे त्यांच्यावर आहे. सध्या त्यांच्या काही कमिशन संदर्भातील ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर फिरत आहेत. त्या व्यवहारांमधून किंवा वादातून हा प्रकार घडला असावा. तपासाअंती सत्य समोर येईलच. मी सध्या धार्मिक आणि यात्रेच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. माझे नाव का घेतले जात आहे आणि यामागे कोणाची फूस आहे, हे शोधणे गरजेचे आहे. चुकीचे आरोप करणे उचित नाही,” असे चिखलीकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान हे दोघेही एकाच पक्षाचे पदाधिकारी असताना अशा प्रकारे आरोप होण्यामागे कोणी तिसरी शक्ती आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या नांदेड पोलीस या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज आणि घोगरे पाटील यांच्या तक्रारीनुसार तपास करत आहेत. या घटनेमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.