
राज्यातील अनेक महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी म्हणजे आज शहरात मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असून, विरोधी पक्षातील नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. या आदेशाविरोधात काही ठिकाणी तर मांसहारी जेवणाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड कल्याणमधील एका हॉटेलमध्ये मांसहारी जेवण करणार आहेत, त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी सरकार आणि कल्याण महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला.
नेमकं काय म्हणाले आव्हाड?
एक प्रतिकात्मक आंदोलनाने आम्ही इथे सुरुवात केली, इथे भोजन होणार आहे, पार्टी नाही. ज्याला तुम्ही स्नेहभोजन म्हणू शकता. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन याविरोधात भूमिका घेतली आहे. कल्याणमध्ये ज्या जीआरचा उल्लेख केला जाते, तो जीआर माझ्याकडे आहे. या जीआरमध्ये मांसविक्रीला बंदी असा कुठेही उल्लेख नाही, कत्तलखाण्याला बंदी आहे, असं आव्हाड यांनी यावेळी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आमचं हेच म्हणणं आहे. ही जोर जबरदस्ती कशासाठी? स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहेना? मग तुम्ही मांसाहाराविरोधात शाकाहाराची लढाई का लावत आहात? सध्या फक्त लढाई लावण्याचे कामं सुरू आहे. जाती-जातीमध्ये, धर्मा-धर्मामध्ये, भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये, ज्याने करून आमचं भलं झालं पाहिजे. महापालिका आयुक्तांना माझी विनंती आहे, की अहो आधी रस्ते सुधारा. कल्याणमधील गटारी सुधरवा, रस्त्याची काय हालत झाली आहे ते बघा, नको ते काम करू नका, तुमच्या रस्त्यावर कोंबड्या चरतात, त्या कोंबड्या लोक खातात तरी कमीत कमी, शासनाने याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो, असा हल्लाबोल यावेळी आव्हाड यांनी केला आहे.
हा मराठी विरूद्ध अमराठी वाद कशासाठी? जर सगळं आपण निवडणुका डोळ्यासमोरच ठेवून करणार असू, तर कशालाच अर्थ राहिला नाही. ही कुठली नवीन राज्यव्यवस्था आली आहे? की लोकांच्या तोंडाला कुलूप लावलं जात आहे. म्हणून आम्ही सर्व समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की याला जुमानायचच नाही, हे वाढतच जाणार आहे, असं आव्हाड यांनी यावेळी म्हटलं.