Jitendra Awhad on Raj Thackeray: मदरश्यात दाढीचा वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान

| Updated on: Apr 03, 2022 | 5:29 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मदरश्यात धाडी टाकल्या तर काय काय सापडेल असा दावा केला होता. राज यांचा हा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळून लावला आहे.

Jitendra Awhad on Raj Thackeray: मदरश्यात दाढीचा वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान
जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मदरश्यात धाडी टाकल्या तर काय काय सापडेल असा दावा केला होता. राज यांचा हा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी फेटाळून लावला आहे. जो माणूस प्रगतीशील वाटायचा. माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा फॉर्म्युला आहे, असं सांगून महाराष्ट्राला (Maharashtra Politics)  पुढे घेऊन जाण्याची भाषा करणारे राज ठाकरे मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का अधोगती आहे कळत नाही, असा टोला लगावतानाच मुंब्र्याच नाव का घेतलं मला समजलं नाही, माझं त्यांना जाहीर आवाहन आहे, सकाळी लवकर उठून मुंब्र्याच्या कोणत्याही मदरश्यात या. मदरश्यात दाढीचा वस्तरा सापडला तर मी राजकारण सोडेन, असं आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिलं.

निष्कारणपणे जातीपातीच्या, धर्माच्या राजकारणामध्ये आग लावायची आणि महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्लॅन सुरू आहे. त्याचे हे सूत्रधार आहेत. काहीजणांना सूत्रं हातात घ्यायची नाहीत. त्यांना असा कोणीतरी लागतो पुढे पुढे करण्यासाठी. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. तुम्हाला वेळ असेल तेव्हा सकाळी लवकर उठून या मुंब्र्यात किंवा स्वतः कधीही घुसा मुंब्र्यात. जा कुठल्यातरी मदरश्याच्या घरात. एक वस्तरा तरी शोधून दाखवा, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हिडीओद्वारे केलं आहे.

टाळ्यांसाठी बोलणं फार सोपं

लाखांच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणं फार सोपं असतं. पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील, महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करा. ज्या घरात जन्माला आला तुम्ही. त्या घरात महाराष्ट्राची संयुक्त चळवळ उभी राहिली आहे, त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

राष्ट्रवादीच्या काळात एकही दंगल नाही

जागतिक राजकारणाविषयी राज ठाकरे यांचा अभ्यास आहे असं बोलतात. पण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल त्यांना किती आहे हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही. दंगल कशाला म्हणतात हे राज ठाकरे यांना माहीत नाही. राज ठाकरे यांनी आजोबांची म्हणजेच प्रबोधनकारांची 4 ते 5 पुस्तके वाचली तर जातपात काय असतं हे समजेल आणि जातीपातीचे जन्मदाते कोण आहेत हेही समजेल. जातपात कशाला म्हणतात? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे, छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत. ते आता राज्याचे अन्न नागरीपुरवठा मंत्री आहेत. सुनील तटकरे लोकसभेत खासदार आहेत. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणं हे शरद पवारांचा आवडतं काम आहे आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात मंडल आयोग आणला, असं त्यांनी सांगितलं.

त्याशिवाय हेडलाईन मिळत नाही

तुमच्या घराच्या बाहेर आठवतं का राज ठाकरे साहेब, दलित विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केलं होतं. त्यांना कसं मारलं गेलं होतं तुमच्या घराच्या बाहेर. आठवतं का तुम्हाला. तुमचं प्रेम, तुमच्या डोक्यातील घृणा हे आज पर्यंत विशिष्ठ कृतीतून कायमच दिसत आली आहे. तुमची मानसिकता काय आहे हे महाराष्ट्राला उशिरा कळली आहे. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय यांना हेडलाईन मिळत नाही, हे गणित ठेवूनच हे लोक भाषण करतात, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Sharad Pawar on Raj Thackeray: एक व्याख्यान देतात अन् चार महिने भूमिगत होतात, ते काय करतात माहीत नाही; शरद पवारांचे राज ठाकरेंना चिमटे

Pravin Darekar : प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस, उद्या चौकशीला हजर राहणार, नेमकं प्रकरण काय?

Bhaskarrao Patil Khatgaonkar on Fadnavis: देवेंद्र फडणवीस देखणे व्यक्तिमत्त्व, भास्करराव पाटील खतगावकर सुस्साट; भविष्यवाणीही वर्तवली