कवितेच्या नव्या वाटेवर ‘काजळकाठ’चा ठसा, साहित्यविश्वातील मान्यवरांनी दिली दाद
ग्रंथालीने प्रकाशित केलेला यामिनी दळवींचा 'काजळकाठ' हा कविता संग्रह मराठी साहित्यविश्वातील एक नवा आश्वासक आवाज ठरला आहे. प्रज्ञा दया पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी या काव्यसंग्रहाचा गौरव केला. प्रेम, विरह या पलीकडे जाऊन स्त्री-अस्तित्व, सामाजिक जाणिवा, आधुनिक एकाकीपणा अशा विविध विषयांवर 'काजळकाठ' नेमकेपणाने भाष्य करतो.

नीरजा, कविता महाजन, प्रज्ञा दया पवार यांच्यानंतर किंवा यांची नावे पुसू शकतील अशी नवी कविता आता पुढे यायला हवी, ग्रंथालीने ‘काजळकाठ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित करुन यामिनी दळवी हे एक आश्वासक नाव पुढे आणले आहे. कविता आणि कवितेसारखे असे आज बरेच काही लिहीले जातेय. अशावेळी यामिनीच्या कवितेला याचे नेमकेपणाने भान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी केलं. ग्रंथाली प्रकाशनच्या वतीने, दिनांक 24 मे 2026रोजी रवींद्र नाट्यमंदिर,लघु नाट्यगृहात यामिनी दळवी लिखित ‘काजळकाठ’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गजलनवाज भीमराव पांचाळे, राष्ट्रीय़ पुरस्कार विजेते दिग्दर्शक, संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक आणि क्रांतिकारी शेतकरी चळवळीचे नेते रविकांत तुपकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि विश्वस्त डॉ. लतिका भानूशाली उपस्थित होते.
ताकदीचं लिखाण करणारी एक महत्वाची कवयित्री
नीरजा, कविता महाजन, प्रज्ञा दया पवार यांच्या ताकदीचं लिखाण करणारी आजच्या पिढीतील एक महत्वाची कवयित्री म्हणून ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवारांनी यामिनीच्या कवितांवर भाष्य केलं. डॉ. सलील कुलकर्णी यांनी यामिनीच्या कवितांचा प्रवास आणि त्यातल्या जाणिवांवर भाष्य करताना ओघवता आणि मार्मिक संवाद साधून उपस्थितांची मनं जिकली. तर गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी शुभेच्छा देताना यामिनीच्या गजलेचंच सादरीकरण केलं ज्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
मनाला भिडणारं ‘काजळकाठ’
प्रकाशनाच्या आधी झालेला कवितांच्या सादरीकरणाचा दिमाखदार प्रयोग हा निश्चितपणे पुस्तक प्रकाशन सोहळा कसा असावा याचा नवा मापदंड ठरवणारा असणार आहे. विनोद गायकर यांच्या दिग्दर्शनाखाली कवितांचं अत्यंत प्रभावीपणे वाचन आणि सादरीकरण करण्यात आलं. ‘चर्चगेटपासून विरारपर्यंत लोंबकळत राहतात कर्जाचे हप्ते’ ही ‘मुंबई’ या कवितेतली ओळ प्रेक्षकांच्या मनात ठसली गेली. मनाच्या गाभाऱ्यातून निघालेल्या आणि पुन्हा मनालाच भिडून परत येणाऱ्या कविता असं काही म्हणायचं झालं, तर ‘काजळकाठ’ या कवितासंग्रहाबद्दल ते अत्यंत अचूक ठरेल.
या कवितासंग्रहात निवडलेले विषयही नेहमीच्या चौकटीत बसणारे नाहीत. प्रेम, विरह, ओढ — या पारंपरिक भावनांपलीकडे जाऊन इथे स्त्री-अस्तित्वाची घुसमट, सामाजिक जाणिवांचा पट, धर्म-जातींच्या सीमांनी उभ्या केलेल्या दऱ्या, आधुनिक जगण्यातल्या एकाकीपणाची छाया अशांसोबतच स्वपासून सुरू झालेला कवितांचा प्रवास विश्वापर्यंत जाऊन पोहोचतो अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली.
यामिनी दळवी लिखीत ‘काजळकाठ’ पुस्तकासाठी – 8689814705 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.