तो पोहायला तयार नव्हता, पण मित्रांनी…; 15 वर्षीय सूर्यासोबत शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? मृत्यूचे गूढ वाढले

कल्याणच्या १५ वर्षीय सूर्य नायडूचा टिटवाळ्यातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या सूर्याचा अपघात नसून घातपात झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला आहे.

तो पोहायला तयार नव्हता, पण मित्रांनी...; 15 वर्षीय सूर्यासोबत शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? मृत्यूचे गूढ वाढले
kalyan surya death
Updated on: Dec 01, 2025 | 9:09 AM

कल्याणच्या चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा टिटवाळा येथील निलंबी गावातील तलावात मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सूर्य नायडू (१५) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. मात्र, हा अपघात नसून, सूर्यासोबत घातपात झाला असल्याचा गंभीर आरोप त्याच्या संतप्त आई-वडिलांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पूर्व येथील रहिवासी असलेला सूर्य नायडू दोन दिवसांपूर्वी त्याच्या काही मित्रांसोबत टिटवाळा परिसरातील निलंबी गावाजवळच्या तलावात पोहण्यासाठी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्याने तलावात उतरून पोहण्यास नकार दिला. याच कारणामुळे त्याची आणि मित्रांमध्ये झटापट झाली. या झटापटीत तोल जाऊन सूर्य पाण्यात पडला किंवा त्याला ढकलले गेले, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने सूर्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.

आई-वडिलांकडून घातपाताचा आरोप

सूर्याच्या मृत्यूमुळे त्याचे आई-वडील पूर्णपणे कोसळले आहेत. त्यांनी हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. हा बुडून झालेला अपघात नाही, तर मित्रांशी झालेल्या झटापटीदरम्यान त्याला पाण्यात बुडवून मारले गेले आहे. यामागे नक्कीच काहीतरी वेगळे कारण आहे आणि पोलिसांनी सत्य बाहेर काढावे, असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. मृत्यूनंतर लगेचच कुटुंबियांनी संताप व्यक्त करत जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही. दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार केला आहे.

आमदार सुलभा गायकवाड यांनी विचारला जाब

या घटनेची माहिती मिळताच कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी तातडीने सूर्याच्या शोकाकुल कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आमदार सुलभा गायकवाड यांनी तात्काळ टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी या घटनेबद्दल जाब विचारला. याप्रकरणी त्यांनी कुटुंबाच्या तक्रारीची गंभीर नोंद घेऊन योग्य आणि कसून चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच सत्य बाहेर काढून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले की, पोलिसांनी केवळ अपघाती मृत्यू म्हणून नोंद न करता घातपाताच्या दृष्टीने कसून आणि निःपक्षपाती चौकशी करावी. सत्य बाहेर काढले पाहिजे. तसेच दोषींना कायद्यानुसार कठोर शासन झालेच पाहिजे. केवळ तोंडी सूचना देऊन न थांबता, या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी लवकरच संबंधित प्रशासकीय विभागाला लेखी निवेदन सादर करण्याची घोषणाही त्यांनी केली.

मित्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी

या घटनेमुळे निर्माण झालेल्या तणावाची आणि आमदार महोदयांच्या मागणीची गंभीरता लक्षात घेऊन टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलीस आता केवळ अपघाती बुडाल्याची शक्यता न तपासता, मित्रांशी झालेल्या झटापटीच्या आरोपाच्या दिशेनेही तपास करत आहेत. या घटनेच्या वेळी सूर्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांची सखोल चौकशी केली जाईल. पोलिसांनी सूर्याच्या कुटुंबीयांना धीर देत या प्रकरणाचा सखोल तपास करून योग्य न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले आहे. या घटनेने कल्याण परिसरात संतापाचे आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस तपासाचा अंतिम अहवाल आणि वैद्यकीय अहवाल यावरूनच सूर्या नायडूच्या मृत्यूमागील नेमके सत्य उघड होईल.