
Kalyan Dombivli Election Result : राज्यात 16 जानेवारी रोजी 29 महापालिकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानुसार बहुसंख्या ठिकाणी भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने महायुती म्हणून विजयी पताका पडकवला आहे. आता महापौरपदाच्या निवडीसाठी राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. मुंबईत महापौर महायुतीचा होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु शिंदे गटाकडून कथितपणे अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्यूला अशी भूमिका घेतली जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबई महापौरपदाचा सस्पेन्स चांगलाच वाढला आहे. दुसरीकडे आता कल्याण डोंबिवलीमध्येही सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी घोडेबाजार सुरू झाला आहे. असे असतानाच आता कल्याण डोंबिवलीमधूनच एक मोठी माहिती समोर येत आहे. नगरसेवक फुटू नयेत म्हणून येथे ठाकरे गटाने आपल्या त्या दोन नगरसेवकांना शेवटचे अल्टिमेटन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबीवली महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या सर्व नगरसेवकांची 19 जानेवारी रोजी एक महत्त्वाची बैठक होती. या बैठकीला 11 पैकी 09 नगरसेवक उपस्थित होते. तर दोन नगरसेवक गैरहजर होते. मधूर मात्रे आणि कीर्ती ढोणे अशा दोन गैरहजर असलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. या गैरहजेरीमुळे ठाकरे गट सध्या अस्वस्थ आहे. दोन्ही नगरसेवक फुटतात की काय? असे विचारले जाऊ लागले आहे. याच कारणामुळे आता ठाकरे गटाने या दोन्ही नगरसेवकांना थेट अल्टिमेटम दिला आहे. दोन्ही नगरसेवकांनी 24 तासांच्या आत पक्षात सामील व्हावे अन्यथा अपात्रतेची कारवाई केली जाईल, अशी नोटीस या दोन्ही नगरसेवकांना बजावण्यात आली आहे.
पक्षाचे आदेश त्यांना पाळावे लागणार आहेत. हे दोन्ही नगरसेवक पक्षात सहभागी न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच त्यांचे नगरसेवक पदही जाणार आहे. त्यामुळे नेमके काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ठाकरे गटाने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे अनुभवी नेते उमेश बोरगावकर यांची गटनेता म्हणून निवड करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला आज मान्यता मिळालेली आहे. या घडामोडी घडत असताना दुसरीकडे दोन नगरसेवकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
ज्यांनी पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडणूक लढवून जे निवडून आले त्यांना पक्षबरोबर राहावे लागणार आहे. त्यांनी असे न केल्यास त्यांचे पद धोक्यात येऊ शकते, असे या नोटिशीनंतर सांगितले जात आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.