
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट भाजपला आव्हान देत युतीच्या चर्चेत मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. युती होवो अथवा न होवो, शिंदे गट स्वबळावर लढायला तयार आहे. जर कोणी युतीशिवाय निवडून येण्याचे स्वप्न पाहत असेल, तर आम्ही त्यांना आडवे करू असा सज्जड दम अरविंद मोरेंनी दिला आहे. त्यांच्या या आक्रमक विधानामुळे कल्याणच्या राजकारणात भाजप आणि शिंदे गटात स्थानिक पातळीवर संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील कथित शीतयुद्ध आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी एका खाजगी कार्यक्रमात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक मोठे विधान केले. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून त्यांनी भाजपला मोठे आव्हान दिले आहे.
युती होवो अथवा न होवो, याल तर तुमच्यासह, नाही आलात तर आडवे करू. शिवसेनेचे जे जे नगरसेवक आहेत, त्यांना आम्ही निवडून आणू. कुणाला असं वाटत असेल की बिना युतीने, कुठलंही काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आमचं ओपन चॅलेंज आहे. आम्ही स्वतः लढायला तयार आहोत,” असे रोखठोक मत अरविंद मोरे यांनी व्यक्त केले.
युतीबाबत संभ्रम कायम असला तरी अरविंद मोरेंनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा, युती होईल तेव्हा होईल, मात्र प्रत्येक वॉर्डात आपली प्रत्येक सीट धनुष्यबाणावर निवडून आली पाहिजे, असे विधान अरविंद मोरे यांनी केले.
अरविंद मोरे यांच्या या आक्रमक विधानामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युती झाली तरी स्थानिक पातळीवर जागावाटप आणि उमेदवार निवडीवरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदे गटातील जिल्हाप्रमुखांनी थेट आव्हान आता कल्याण आणि डोंबिवलीतील भाजपचे स्थानिक नेते तसेच वरिष्ठ नेतृत्व कसे स्वीकारते आणि यावर कोणती प्रतिक्रिया देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.