
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रभाग रचना केल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या काही भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी अचानक भेट दिली. यामुळे शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी कट्टर राजकीय विरोधक असलेले हे दोन्ही नेते एकाच छताखाली आल्याने, आगामी निवडणुकीत काही नवीन समीकरणे जुळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केडीएमसीची प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली असून, ४ सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर लगेचच निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली आहे. विशेषतः, महापौरपद कोणाकडे जाणार यावरून दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत, रविंद्र चव्हाण यांनी थेट ठाकरे गटाच्या नेत्याची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही भेट केवळ गणेश दर्शनापुरती औपचारिक होती की त्यामागे राजकीय गणितं आहेत, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
यापूर्वी, शिंदे गटाचे काही महत्त्वाचे नेतेही दीपेश म्हात्रे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे, विविध पक्षांच्या नेत्यांच्या म्हात्रे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. कोण कोणत्या पक्षात जाणार, कोणाचा पक्ष अधिक बळकट होणार आणि महापौरपदासाठी कोण सर्वाधिक नगरसेवक आपल्या बाजूने खेचणार, अशा अनेक प्रश्नांवरून स्थानिक पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक भाजप नेते रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे आणि मनसे नेते राजू पाटील अशा अनेक दिग्गजांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे, यंदाच्या गणेशोत्सवात घडणाऱ्या या राजकीय भेटीगाठी आगामी निवडणुकीची दिशा ठरवतील, असे मानले जात आहे. हे नेते फक्त गणपती दर्शनासाठी एकत्र आले की त्यांच्या मनात काही वेगळेच राजकीय डावपेच आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकूणच, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या भेटीगाठींनी कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात एक वेगळाच रंग भरला आहे.