
देशभरात सर्वत्र सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. एकीकडे नववर्षाचे स्वागत होत असतानाच कल्याण-डोंबिवलीत मात्र निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हवामानात कमालीची तफावत जाणवत आहे. कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना एकाच वेळी थंडी आणि उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. त्यातच फटाक्यांची आतषबाजी आणि वाहनांच्या धुरामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) खालावल्याने चिंतेत भर पडली आहे.
आज पहाटेपासून शहरात काहीसा गारठा जाणवत होता. मात्र काही वेळातच हे चित्र वेगाने बदलले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज कल्याण-डोंबिवलीचे किमान तापमान २९°C इतके उच्चांकी नोंदवण्यात आले आहे, तर कमाल तापमान ३० ते ३३°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हिवाळ्याच्या दिवसातही दुपारी उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीत हवेची गुणवत्ता ढासळली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी झालेली फटाक्यांची आतषबाजी आणि पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या वाहनांच्या धुरामुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. कल्याणमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १०९ ते ११६ च्या दरम्यान नोंदवला गेला आहे. तर डोंबिवलीत AQI ९० ते ११० च्या दरम्यान आहे. हा निर्देशांक ‘मध्यम’ ते ‘वाईट’ श्रेणीत मोडत असून, यामुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. शहरावर प्रदूषणाची एक धुरकट चादर पसरल्याचे चित्र सकाळी पाहायला मिळाले.
हवेतील वाढते प्रदूषण आणि तापमानातील चढ-उतार यामुळे श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. विशेषतः १. ज्येष्ठ नागरिकांना श्वसनास त्रास होणे किंवा दम लागण्याचे प्रमाण वाढू शकते. तसेच लहान मुलांना खोकला आणि घशाचे संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यासोतबच अस्थमा किंवा ब्रॉन्कायटिस असलेल्या रुग्णांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा आणि या काळात भरपूर पाणी पिण्याचे आणि शक्यतो दुपारच्या वेळी थेट उन्हात जाणे टाळण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
दरम्यान हवामानातील हा लहरीपणा आणि ढासळलेली हवेची गुणवत्ता पाहता आगामी काही दिवस कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकतात. निसर्गाच्या या बदलत्या रुपामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. प्रशासनाकडूनही प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तोपर्यंत आरोग्याची काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे दिसून येत आहे.