“आजी जरा बाजूला व्हा…” एका शब्दाने घात केला, वृद्धेसोबत काही सेकंदात जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले!
कल्याण स्टेशन परिसरात ७५ वर्षीय वृद्ध आजींना धक्का देऊन १ लाख २० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केली. भावाच्या लग्नातील २५ वर्षांची आठवण हिरावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

कल्याण स्टेशन परिसरात भरदिवसा गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्याने अत्यंत चलाखीने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीला गेलेली ही बांगडी केवळ एक दागिना नव्हती, तर तब्बल २५ वर्षांपूर्वी भावाच्या लग्नात मिळालेली एक अनमोल आणि भावनिक आठवण होती. ज्या आजारी भावाला भेटण्यासाठी आजी निघाल्या होत्या, त्याच भावाची आठवण चोरट्याने हिरावून नेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
गर्दीचा फायदा घेत चोरट्याने साधला डाव
मिळालेल्या माहितीनुसार, नलिनी प्रताप शहा (७५) असे या दुर्दैवी वृद्ध महिलेचे नाव असून त्या मुरबाड येथे राहतात. कल्याणमध्ये राहणाऱ्या आपल्या आजारी लहान भावाची तब्ब्येत विचारण्यासाठी नलिनी आजी मंगळवारी दुपारी मुरबाडहून बसने कल्याणकडे येण्यास निघाल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्यांची बस कल्याण स्टेशनजवळील अनंत हलवाई बसस्टॉपवर पोहोचली.
दुपारची वेळ असल्याने बसमध्ये आणि बसस्टॉपवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. नलिनी आजी बसमधून खाली उतरत असतानाच अचानक गर्दीत पाठीमागून आलेल्या एक अज्ञात चोर आला. त्याने “आजी, जरा बाजूला व्हा” असे म्हणत त्यांना मुद्दामहून जोराचा धक्का दिला. आजींना काही समजण्याच्या आतच, त्या चोरट्याने त्यांच्या हातातील सुमारे २४ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी अत्यंत शिताफीने चोरली. यानंतर गर्दीचा फायदा घेत तिथून पळ काढला.
काही वेळाने आजींचे लक्ष आपल्या हाताकडे गेले, त्यावेळी हातातील सोन्याची बांगडी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बांगडी नलिनी आजींना २५ वर्षांपूर्वी त्यांच्या लहान भावाच्या लग्नात भेट म्हणून मिळाली होती. भावाचे प्रेम आणि आठवण म्हणून त्या ही बांगडी नेहमी आपल्या हातात घालत असत. ज्या भावाला भेटण्यासाठी त्या एवढ्या लांबून आल्या, त्याच्याच लग्नाची ही आठवण चोरीला गेल्याचे समजताच आजींना मोठा धक्का बसला. त्यांना अश्रू अनावर झाले.
महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेचे गांभीर्य ओळखून नलिनी शहा यांनी तातडीने कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. याबद्दल घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी आजींच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेल्या २४ ग्रॅमच्या बांगडीची अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चोरीच्या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार महेंद्र मंझा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी कल्याण स्टेशन आणि अनंत हलवाई बसस्टॉप परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयित आरोपीचा माग काढला जात आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
दरम्यान कल्याण स्टेशन आणि बसस्टॉप सारख्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना कोणी अनोळखी व्यक्ती अंगावर येत असल्यास किंवा विनाकारण धक्का देत असल्यास त्वरित सावध व्हावे. प्रवास करताना वृद्ध नागरिकांनी शक्यतो अंगावर मौल्यवान दागिने घालणे टाळावे, असे आवाहन केले आहे.